

बेळगाव ः अवकाळी पावसात पिके गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात अपयशासह शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपने मंगळवारी सुवर्णसौधवर मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा अर्ध्या वाटेतच अडवून नेते-शेतकऱ्यांची धरपकड केली. त्यामुळे सुवर्णसौधला घेराव घालण्याचा भाजपचा प्रयत्न अपयशी ठरला. दरम्यान, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारविरुद्ध भाजपने मोर्चा काढला पाहिजे, असा प्रतिटोला काँग्रेसने लगावला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. बी. एस. येडियुराप्पा रोडवरील मालिनी सिटीमधून मोर्चाला सुरुवात झाली. सरकारविरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला होता. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आर. अशोक, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार अभय पाटील, आमदार भालचंद्र जारकीहोळी, आमदार सी. टी. रवी, माजी मंत्री रेणुकाचार्य, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार अरविंद पाटील, भाजपनेते डॉ. रवी पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह जिल्हा आणि राज्यातील नेते मोर्चात सहभागी झाले होते.
बेळगावात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस भाजपच्या मोर्चामुळे गाजला. मोर्चापूर्वी झालेल्या सभेत बोलताना विजयेंद्र म्हणाले, अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मुख्यमंत्र्यांनी हवाई दौरा करून शेतकऱ्यांचे दुःख कळणार आहे का? शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावता मुख्यमंत्री आपली खुर्ची कशी टिकविता येईल, याकडे अधिक लक्ष देत आहेत. सरकारला जनतेच्या समस्यांशी काहीच देेणे घेणे नाही. बेरोजगारी, पाणीप्रश्न, विणकरांच्या समस्या सरकारने सोडविल्या नाहीत. विरोधी नेते आर. अशोक म्हणाले, सरकार जबाबदारी झटकत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवून वेळ काढूपणा करत आहे. शेतकऱ्यांसाठी खजिन्यात पैसे नाहीत का? हा पैसा कुठे जात आहे. शेतकरी आत्महत्येत कर्नाटकात आज देशात दुसऱ्या स्थानावर आहे. सुमारे 2400 अन्नदात्यांनी आत्महत्या केली आहे.