

बेळगाव : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवार दि. 7 रोजी बेळगाव जिल्ह्यातील विविध केंद्रांवर सुरळीत पार पडली. सकाळी आठपासूनच परीक्षार्थी केंद्रांवर हजर होते. परीक्षार्थींना तपासूनच केंद्रांवर साडण्यात येत होते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर 13,088 परीक्षार्थींनी परीक्षा दिली.
सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नजर होती. परीक्षार्थींना केवळ हॉल तिकीट आणि पेन नेण्याची परवानगी होती. अन्य कोणतीही वस्तू घेण्यास मनाई करण्यात आली होती. शहरातील 16 परीक्षा केंद्रांवर सकाळी 9.30 ते 12 या वेळेत इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर झाला.
पहिल्या पेपरसाठी 4,022 परीक्षार्थींनी नोंद केली होती. दुपारच्या सत्रात 2 ते 4.30 या वेळेत इयत्ता 6 वी ते 8 वीसाठी दुसरा पेपर पार पडला. या पेपरसाठी 9,066 परीक्षार्थींनी अर्ज केले होते. दुपारच्या सत्रात 37 परीक्षा केंद्रांवर पेपर पार पडला आहे.
राज्यात 18 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांची नियुक्ती करणार आहे. त्यासाठी लवकरच टीईटीचा निकाल जाहीर करून सीईटीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात टीईटी सुरळीत पार पडली. परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.