

निपाणी : निपाणी शहर व उपनगरात गेल्या दहा दिवसापासून बुरखाधारी चोरट्याचा धुमाकूळ सुरूच आहे यामध्ये चोरट्यांनी कहर करीत शहरातील उच्चभ्रू म्हणून समजल्या जाणाऱ्या माने प्लॉटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला. शिवाय बंदोबस्तासाठी आलेल्या बंदुकधारी पोलिसांना शस्त्र, दगड व काठ्या दाखवीत आणि त्यांची दुचाकी पाडत पळ काढला. सुमारे तासभर थरारनाट्य चालवले. त्यामुळे माने प्लॉट परिसरात घबराट पसरली होती. पोलिसांनी चोरट्यांचा पहाटेपर्यंत शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत.
गेल्या 10 दिवसांत निपाणी शहर व उपनगरात सहा घरे व एक भांडी दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे 60 तोळे सोने, रक्कम 50 हजार व चांदीचे दागिने असा ऐवज लांबवला आहे. सोमवार दि. 1 डिसेंबररोजी बिरोबा माळ येथील राहिवासी सुनीलकुमार वडगावे यांचा बंद बंगला भरदिवसा फोडून दुचाकीवरून आलेल्या बुरखाधारी तीन चोरट्यांनी पळ काढला होता. ते अजून सापडलेले नाहीत. त्यानंतरही आजतागायत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच आहे.
शुक्रवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास चार बुरखाधारी चोरटे माने प्लॉटमध्ये आल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार दुचाकीवरून आलेले पोलिस कर्मचारी अर्जुन आरबोळे व होमगार्ड कर्मचारी अण्णासाहेब अब्दागीरे यांना दगड व चाकूचा धाक दाखवित, त्यांची दुचाकी ढकलून देत पळ काढला. त्यानंतर तातडीने सीपीआय बी. एस. तळवार, शहरचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांच्यासह दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. पण ते पसार झाले होते. तत्पूर्वी चोरट्यांनी बेल्लद यांचा बंद बंगला फोडून ऐवज व रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाला. त्यानंतर चोरट्यांनी विद्यामंदिर शाळेचे शिक्षक रावसाहेब जनवाडे यांचा बंद असलेला केदारलिंग बंगला फोडण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक रहिवासी प्रभाकर हेगडे यांना जनवाडे यांच्या शेजारी राहत असलेल्या प्रियांका कुलकर्णी यांनी तासापूर्वी चौघे चोरटे येऊन गेल्याचे सांगत मोबाईलवरून सीसीटीव्ही फुटेज पाठवले. त्यानंतर हेगडे यांनी राजेंद्र सदर यांना फोन करीत तशी सूचना दिली. त्यानंतर सदलगे यांनी सुनील नेजे यांना फोन करून पोलिसांना पाचारण केले. हातात बंदूक घेऊन गस्तीसाठी आलेल्या पोलीस व होमगार्ड कर्मचारी यांना चोरटे दिसले खरे. पण बुरखाधारी चोरट्यांनी दगड, चाकू व काठ््या दाखवत त्यांची दुचाकी खाली पाडून पळ काढला. निपाणी शहर उपनगरात दिवसागणीक चोरींच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.