

बेळगाव : कित्येक महिन्यांपासूनची मागणी असणारी बेळगाव-बंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे अखेर 10 ऑगस्टपासून धावणार आहे. पहाटे पावणेपाच ते रात्री 9 या वेळेत ही रेल्वे बेळगाव-बंगळूर-बेळगाव अशी एक फेरी पूर्ण करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येत्या रविवारी या सेवेचे बंगळुरात उद्घाटन होणार आहे.
राज्यातील ही 11 वी वंदे भारत रेल्वेसेवा असेल. ही रेल्वे रोज धावेल. बंगळूर-बेळगाव वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. रेल्वेमंत्र्यांनी मे महिन्यात मंजुरी दिली होती. खासदार जगदीश शेट्टर सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, आता पंतप्रधान मोदी बंगळूरमधून या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. रविवारी सकाळी 10 वाजता बंगळूर रेल्वेस्थानकावर हा सोहळा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनासाठी येणार असल्याने राज्यातील भाजप नेत्यांनी रोड शो आणि सभेची तयारी केली होती. मात्र पंतप्रधान कार्यालयाने रोड शोला नकार दिला आहे. यामुळे भाजप नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला राज्यातील भाजपने शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती.
बेळगाव-बंगळूर वंदे भारतला एकूण 7 थांबे असतील. लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगिरी, तुमकूर व यशवंतपूर या स्थानकावर वंदे भारत थांबेल. एक्झिक्युटिव्ह आसनाचे तिकीट 2,500 तर, साध्या आसनाचे तिकीट 1,500 रुपये असेल. प्रवासादरम्यान चहा, नाश्ता व दुपारच्या जेवणाची सोय असेल. रेल्वे विभागाने वेळापत्रक जाहीर केले आहे.
बेळगावहून निघणार : पहाटे 5.45
बंगळूरला पोचणार : दुपारी 1.30
बंगळूरहून निघणार.. : दुपारी 2.30
बेळगावला पोचणार. : रात्री 9
एकूण डबे........... : 8
एकूण प्रवासी क्षमता. : 520
तिकीट दर.. : 1500 ते 2500 रु.