

बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युनियनचे अध्यक्ष निंगराज एस. कऱ्याण्णावर यांच्यावर अथणी येथे आ. सवदी यांच्या निवासासमोर प्राणघातक हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. हल्ल्यानंतर कऱ्याण्णवर स्वतःहून अथणी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. शिवाय अथणी पोलिसांसमोर घटनेचे गाऱ्हाणे मांडले. या घटनेमुळे सायंकाळी उशिरापर्यंत तणावग्रस्त वातावरण होते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे युनियनचे अध्यक्ष कऱ्याण्णावर कर्मचाऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी आ. सवदी यांच्या निवासस्थानी गेले होते. पण शाब्दिक वाद झाल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आले. यावेळी श्रीकांत अलगोर नावाच्या व्यक्तीने हा विषय येथे बोलण्याचा नाही, असे सांगितल्यानंतर शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर त्यांच्या घरासमोर कऱ्याण्णावर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे. श्रीकांत अलगोर यांनीही कऱ्याण्णावर यांच्याविरुद्ध अथणी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
शासकीय दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल झाल्यावर कऱ्याण्णावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. माझा जीव धोक्यात असून संरक्षण मिळावे. अन्यथा मी स्वतःहून आत्महत्या करेन. हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. कऱ्याण्णावर यांना अधिक उपचारासाठी बेळगाव खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
घटनेनंतर 700 कर्मचाऱ्यांनी अथणी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी अथणी पोलिसांना निवेदन दिले. शिवाय सोमवारपासून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राज्यातील सर्व शाखा बंद ठेवून आंदोलन करू, असा इशारा युनियनचे उपाध्यक्ष आनंद पाटील यांनी दिला आहे. सदर निवेदन बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख यांनाही दिले असल्याचे सांगितले.
घटनेनंतर आ. सवदी यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांनी आ. सवदी यांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असून बाहेरील राजकारण येथे चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे. यावेळी आ. लक्ष्मण सवदी यांचे पुत्र चिदानंद सवदी, कृष्णा साखर कारखान्याचे पराप्पा सवदी, अमोघ खोबरी, विलास टोणे, राजू पासले, सिद्राय येलडगी, निजगुनी मगदूम, अशोक पुजारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आ. सवदी यांच्या घरासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
घटनेशी आमचा संबंध नाही : आ. सवदी
याबाबत आ. लक्ष्मण सवदी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या घरी ते सकाळी आले होते. युनियनविषयी त्यांनी चर्चा केली. पण समजावून सांगून त्याला बाहेर काढले. आमच्या कार्यकर्त्यांशी त्यांची शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली आहे. या घटनेचा आम्हा पिता-पुत्रांचा कोणताही संबंध नाही. हे राजकीय षडयंत्र असल्याचा खुलासा केला.