

निपाणी : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट येथे शिप्पूर फाट्यानजीक स्पीड ब्रेकरमुळे दोन ट्रकाच्यामध्ये कार चिरडल्याने झालेल्या अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली तर लहान बालकासह पाच जण गंभीर जखमी झाले. अक्षता दिलीप डहाळे (वय २५ रा. कोथरूड, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातातील मयत व जखमी हे गोवा येथून पर्यटन करून रविवारी रात्री परतत होते. घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कारचालक अजय अशोक शेळके (वय २८) हा कोथरूड (पुणे) येथून कारमधून मृत अक्षता यांच्यासह सचिन देवीदास सासवे (वय २५), स्नेहल अर्जुन खेतरी (वय १७), योगिता योगेश निंबरे (वय ३५), यश (वय ७) या सर्वांना घेऊन २४ ऑक्टोंबर रोजी पुणे येथून गोवा येथे पर्यटनासाठी गेला होता. दरम्यान पर्यटन करून हे सर्वजण आपल्या मूळगावी कोथरूड, पुणेकडे कारने १० च्या सुमारास परतत होते. दरम्यान तवंदी घाटात शिप्पूर फाट्यानजीक ही कार आली असता स्पीड ब्रेकर असल्याने कारच्या पुढील टूमकुरहून मुंबईकडे निघालेल्या दूध टँकर चालकाने वाहनाचा वेग कमी केला. त्यामुळे कारचालक अजय शेळके यांनीही आपल्या वाहनाचा वेग कमी करीत वाहन थांबवले. दरम्यान याचवेळी बंगळूर येथून पुण्याकडे निघालेल्या कंटेनर विजयमुत्तू याचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याच्या कंटेनरची कारला मागून जोराची धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात कार कंटेनरमध्ये चिरडल्याने कारमधील महिला अक्षता डहाळे या जागीच ठार झाल्या तर चालकासह पाचजण गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे यांनी घटनास्थळी धाव पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार संकेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. एम. आवजी यांनी भेट देऊन अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी कोल्हापूरला हलविले.दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. याबाबत कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक आवजी हे करीत आहेत
तवंदी घाट येथे बेळगावहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर शिप्पूर फाट्यानजीक मोठ्या उंचीचा स्पीड ब्रेकर करण्यात आला आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी हा स्पीड ब्रेकर वाहनधारकांना दिसत नाही. त्यामुळे या टापूत लहान मोठ्या अपघात होतात. दरम्यान रविवारी रात्री झालेल्या अपघातात दूध टँकर चालकाला वेळीच स्पीड ब्रेकर न दिसल्याने त्याने अचानक वाहनाचा वेग कमी केला. त्यापाठोपाठ कार थांबली व लागलीच कारवर मागून येणारा कंटेनर आदळल्याने हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रस्ते बांधकाम कंपनीने ठीकठिकाणी स्थापित केलेल्या स्पीड ब्रेकर जवळ रेडियम अथवा पांढरे पट्टे मारणे गरजेचे आहे.