

खोडाळा (ता. मोखाडा) : नाशिक–जव्हार मार्गावर निळमाती गावाजवळ रुग्णवाहिका आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास घडला. मृतांमध्ये अनील सीताराम खरपडे आणि चिंतामण कृष्णा किरकिरे (दोघे रा. नाशिक परिसर) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय रुग्णवाहिका जव्हारकडून नाशिकच्या दिशेने जात असताना चालक रमेश रामराव बर्डे (वय ४५, रा. जव्हार, जि. पालघर) यांनी वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालविले. निळमाती गावाजवळ वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांनी जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील अनील खरपडे आणि चिंतामण किरकिरे हे दोघे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.
अपघातात रुग्णवाहिका चालक रमेश बर्डे यालाही दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मोखाडा पोलिस ठाण्यात रमेश बर्डे याच्याविरुद्ध निष्काळजी वाहनचालकतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासानंतर आरोपी चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून पुढील तपास मोखाडा पोलिसांकडून सुरू आहे.