

सोलापूर : एस.टी. बस आणि दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शहरातील हैदराबाद रोडवरील चंदन काटा येथे घडली.
शाहेनाज महेबुब शेख (वय 34, रा. कुंभारी, दक्षिण सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे, तर तिचे पती महेबुब नबिलाल शेख (वय 38, रा. कुंभारी, दक्षिण सोलापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. शेख दाम्पत्य तांदुळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नातून परतत असताना हैदराबाद रोड, चंदन काटा येथे हा अपघात घडला.
मयत शाहेनाज यांच्या पश्चात आई, पती, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. जखमी महेबुब यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. हैदराबाद रस्त्यावरील अपघाताची मालिका थांबत नसल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागत आहे. महामार्गावरील खराब खड्ड्यांमुळे शनिवारी कंटनेर उलटल्याची घटना घडली होती. या परिसरातील अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.