

बेळगाव : बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरु झाल्याने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपर्यंत असून ते संपेपर्यंत सीमेवरील तपासणी नाके कडक सुरक्षेत सुरुच राहणार आहेत. अधिवेशन काळात सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी तपासणी नाके सुरु करण्यात आले आहेत, असे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावमधील हिवाळी अधिवेशनाच्या काळात सीमाभागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी सीमेवर तपासणी नाके उभारले आहेत. याठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. बेळगाव तालुक्यात शिनोळी, बेकिनकेरे, राकसकोप येथे तर निपाणी, संकेवर आदी ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आलेे आहेत. याठिकाणी संशयित वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म. ए. समितीकडून दडपशाही झुगारुन महामेळावा घेण्यात आला. महामेळाव्याला महाराष्ट्र राज्यातून नेतेमंडळी उपस्थित राहतील, या धास्तीनेही सीमाहद्दीवर तपासणी नाके उभारण्यात आले. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची विशेष चौकशी केली जात आहे. अधिवेशन काळात गैरप्रकारांना ऊत येतो. बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सीमाभागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत कर्नाटक प्रशासनाने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच समितीचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. महामेळाव्याला महाराष्ट्रातून नेते किंवा विविध संघटना बेळगावात प्रवेश करतील, अशी भीती कर्नाटकी प्रशासनाला होती. तपासणी नाके मुख्यत्वे महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गांवर कार्यरत आहेत. या नाक्यांवर राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.