

Belgam Child Deaths Diarrhea
बेळगाव : तीव्र स्वरूपाच्या अतिसारामुळे होणार्या बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. ते शून्यावर आणण्यासाठी ‘अतिसार थांबवा अभियान-2025’ मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याबद्दल लोकांमध्ये जागृती करावी, अशी सूचना जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली.
अतिसार थांबवा अभियान नियोजनाबाबत आरोग्य खात्याची बैठक बुधवारी (दि. 18) जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला. योजना राबविण्यात मागे असलेल्या तालुका आरोग्य अधिकार्यांना येत्या काळात योजनांचा वेग वाढवून अहवाल सादर करण्यास बजावले.
ते म्हणाले, स्वच्छतेबाबत जागृती करण्यात यावी, हात योग्यप्रकारे धुणे, वैयक्तिक स्वच्छता याबाबत लोकांना माहिती द्यावी. अतिसाराने बाधित मुलांसाठी आपत्कालीन काळजी आणि योग्य उपचारांबद्दल सामान्य जनतेमध्ये, विशेषतः पालक आणि मुलांमध्ये जागृती करावी. 0 ते 5 वयोगटातील मुलांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील कोणत्याही मुलाला अतिसाराचा त्रास होऊ नये यासाठी जिल्ह्यात यशस्वीरित्या कार्यक्रम राबवावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
पावसाळा सुरू होताच साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊ शकते. त्यामुळे, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरियासारखे आजार पसरू शकतात. डासांच्या उत्पतीस्थळांचा नाश करण्यासाठी अळ्यांचे सर्वेक्षण करून सर्वेक्षण करावे, असे आदेश सीईओ शिंदे यांनी दिले. यावेळी जि. पं. उपसचिव बसवराज अडवीमठ, मुख्य नियोजन अधिकारी गंगाधर दिवटेर, आरोग्याधिकारी डॉ. एस. एस. गडाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. व्ही. व्ही. शिंदे, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. चांदणी देवडी, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ. एस. एस. सायण्णावर, कुष्ठरोग नियंत्रण अधिकारी डॉ. गीता कांबळे, जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. विश्वनाथ भोवी, डॉ. विवेक होन्नल्ली, डॉ. संजय दोडमनी, एच. अरुणकुमार यांच्यासह तालुका आरोग्याधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात प्रौढांसाठी बीसीजी लस देण्यात येत आहे. 60 वर्षांवरील सर्वांना, तसेच पाच वर्षांपासून क्षयरोगग्रस्त असलेल्या 18 वर्षांवरील लोकांना, धूम्रपान करणारे, क्षयरोगाच्या रुग्णांच्या संपर्कात असलेले, मधुमेही आणि त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी वजनाच्या लोकांना दिली जात आहे. बीसीजी लसीकरण करून जिल्हा क्षयरोगमुक्त जिल्हा बनवण्याचे आवाहन सीईओ शिंदे यांनी केले.