

बेळगाव : छत्रपती शिवाज महाराजांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळते. त्याच प्रेरणेतून बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंनी मोठे यश मिळविले असून ते नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. कोणत्याही खेळात नावलौकिक मिळविताना त्याची दखल घेणे महत्वाचे असते. यातून त्या खेळाडूंना आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते, असे मत उद्योजक शिरीष गोगटे यांनी केले.
थिंपूमध्ये (भूतान) झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत पदके मिळविलेल्या प्रताप कालकुंद्रीकर, व्यंकटेश ताशिलदार व व्ही. बी. किरण यांना बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे नर्तकी सिनेमागृहात सोमवारी (दि. 16) सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
एम. के. गुरव यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उद्योजक दिलीप चिटणीस म्हणाले, कोणताही स्पर्धेत भाग घेणार्या खेळाडूंना आम्ही मदत करतो. त्यामागचा उद्देश हा केवळ बेळगावातील खेळाडू पुढे यावेत हाच आहे. बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंनी मिळविलेले यश सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनचे कार्याध्यक्ष अविनाश पोतदार म्हणाले, या खेळाडूंना आत्मविश्वासामुळेच यशाला गवसणी घालणे शक्य झाले आहे. खेळाडूंना उद्योजक पाठबळ देतात. पण, पैशांचा कुठे तरी सदुपयोग व्हायला पाहिजे. बक्षीस पैशाच्या स्वरुपात नसले तरी पदकाची किंमत अनमोल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मारुती देवगेकर, माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल, एम. गंगाधर, हेमंत हावळ, सुनील राऊत, सुनील पवार यांच्यासहअसोसिएशनचे सदस्य व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेता कालकुंद्रीकर, रौप्यपदक विजेता ताशिलदार व कांस्यपदक विजेता किरण यांना शाल, पुष्पहार, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान करताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मंचावर निमंत्रित करण्यात आले. या सत्काराने शरीरसौष्ठवपटू व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले.