

बेळगाव : ग्रामीण मतदारसंघातून मी आमदार झाले. मंत्रीपदापर्यंतही मजल मारली. ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्चशिक्षित झाले पाहिजेत, हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून दहावी व बारावीत गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रामीण प्रतिभा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आता प्रत्येक शाळेतील वर्ग स्मार्ट बनविणार आहे, अशी ग्वाही महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
लक्ष्मीताई फाउंडेशनतर्फे रविवारी (दि. 15) बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील दहावी व बारावीत 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण प्रतिभा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. आमदार चन्नराज हट्टीहोळी, जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, गटशिक्षणाधिकारी एस. पी. दासण्णावर, पदवीपूर्व उपसंचालक एम. एम. कांबळे, एपीएमसी माजी अध्यक्ष युवराज कदम, पोलिस निरीक्षक उस्मान अवटी, सुरेश इटगी, मनोहर बेळगावकर, महेश कोलकार, रमेश पाटील, गायत्री पाटील, नागेश देसाई व्यासपीठावर होते.
त्या पुढे म्हणाल्या, आई-बापांना त्यांची संपत्ती विचारली तर ते मुलेच आपली संपत्ती असल्याचे सांगतात. मात्र, मुले मोठी झाल्यानंतर संपत्ती विचारली तर ती आईवडीलांचे नाव घेत नाहीत. ही वस्तुस्थिती बदलण्याची गरज आहे. माझ्या मतदारसंघातील मुलांनी गवंडी, प्लंबर, वायरमन, सेंट्रिंग यासारखी कष्टाची कामे न करता डॉक्टर, अभियंते, आयपीएस उच्चशिक्षित झाली पाहिजेत, असा माझा मानस आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा टक्का वाढविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. दहावी, बारावीनंतर पुढे काय यावरही कार्यशाळा घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर दहावी व बारावीतील 700 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्कूल बॅग, टिफिन बॉक्स, पाण्याची बॉटल व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देण्यात आली. यावेळी विद्यार्थी, पालक, शाळा सुधारणा समितीचे सदस्य व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
राज्य सरकारने शैक्षणिक विकासाला प्राधान्य दिले आहे. इंदिरा गांधी, मुरारजी देसाई आदी वसती शाळांचा विकास करण्यात येणार आहे. प्रत्येक सरकारी शाळेत स्मार्ट क्लासची निर्मिती करणार आहे. त्यासाठी 22 कोटी खर्च करणार आहे. ग्रामीण मतदारसंघ शैक्षणिक विकासाचे मॉडल म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार हट्टीहोळी आपल्या भाषणात म्हणाले.