

बेळगाव ः बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी आणि गोकाक यांना नवीन जिल्हे घोषित करण्याबाबत मते गोळा केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे महसूल मंत्री कृष्ण ब्यायरेगौडा यांनी विधानसभेत सांगितले. त्यानंतर सायंकाळी उत्तर कर्नाटकाच्या विकासावरही विधानसभेत चर्चेला सुरुवात झाली. पुढचे दोन दिवस ही चर्चा चालणार आहे.
सुवर्णसौधमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 9) संध्याकाळी यावर लक्षवेधी मांडण्यात आली. रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून गोकाक आणि चिकोडी जिल्हा स्थापनेचा विषय मांडला. लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री ब्यायरेगौडा म्हणाले, मोठ्या जिल्ह्यांचे प्रशासकीयदृष्ट्या व्यवस्थापन करणे कठीण आहे. लोकाभिमुख प्रशासन देणे कठीण असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून दोन किंवा तीन नवीन जिल्हे निर्माण करण्याच्या विनंत्या आल्या आहेत. हा विषय संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज आहे. त्यासाठी मते गोळा करण्याची प्रक्रिया पार पाडली पाहिजे. सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करून अंमलबजावणी केली जाईल. आमदार शशिकला जोल्ले आणि भालचंद्र जारकीहोळी यांनीही नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीच्या गरजेकडे सरकारचे लक्ष वेधले.