

बेळगाव ः सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असतानाच भाजपने सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे 8 ते 19 डिसेंबर असे दहा दिवसांचे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनात भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या रविवारी (दि. 7) दुपारीच बेळगावात दाखल होणार आहेत.
राज्यात मुख्यमंत्री बदलासाठी जोरदार घडामोडी घडत आहेत. काँग्रेस हायकमांडने हा विषय तूर्तास लांबणीवर टाकला असला, तरी अंतर्गत हालचाली सुरूच आहेत. त्यामुळे बेळगावात सोमवारपासून होणाऱ्या अधिवेशनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या अधिवेशनात सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधी भाजप आणि निजदकडून सुरू आहे. त्यामुळे सरकारला कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी फिल्डिंग लावली आहे. सोमवारी (दि. 8) काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे सिद्धरामय्या रविवारी दुपारीच बेळगावात दाखल होत आहेत.
विधिमंडळ अधिवेशनासाठी जिल्हा प्रशासनाचे तयारी पूर्ण केली आहे. गुप्तचर खात्याने हाय अलर्ट जारी केला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त राखण्यात येणार आहे. साडेसहा हजार पोलिस कर्मचारी बेळगावात दाखल होत आहेत. इतर खात्यांचे अधिकारी गेल्या आठवड्यातच दाखल झाले असून, या अधिवेशन काळात त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विशेष मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे.
अपेक्षा उत्तर कर्नाटकाच्या विकासाची
अधिवेशनात महत्त्वाच्या आठ विधेयकांवर चर्चा करण्यात येणार आहे. एकीकडे सरकार अंतर्गत कलहातून जात असताना सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षाने उत्तर कर्नाटकाचा विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंगळवारी (दि. 9) मोर्चाचे आयोजन केले आहे. अधिवेशन काळात शेतकरी, जिल्हा विभाजन, स्वतंत्र उत्तर कर्नाटक आणि पंचमसाली आरक्षणासाठी आंदोलने होणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन सरकारसाठी मोठी कसोटीच असणार आहे.