

बेडकिहाळ (पुढारी वृत्तसेवा): येथील गळतगा रस्त्याच्या पश्चिमेस असलेल्या नाईक, कोणाप्प, काकडे, बाबर, घोडके आणि कोडी मळा परिसरातील सुमारे २२ शेतकऱ्यांच्या ३६ एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर वाहिन्यांमध्ये घर्षण होऊन ठिणक्या पडल्या. या ठिणक्या संतोष नाईक, विनायक नाईक आणि महादेव नाईक यांच्या उसाच्या शेतात पडल्याने पाल्याने पेट घेतला. या घटनेत भाऊसाहेब लठे, चंद्रकांत बाबर, मुरली बाबर, गजानन काकडे, उत्तम घोडके, विलास घोडके, प्रकाश काकडे, महेश काकडे, नारायण काकडे,
बाबुराव घोडके, पांडुरंग खोत, चंद्रकांत काकडे, महावीर कुमार, आदगौडा पाटील आणि संतोष पाटील-कोणाप्प या शेतकऱ्यांचा ऊस जळाला. घटनेची माहिती मिळताच ग्राम तलाठी एस. एन. नेम्मानवर यांनी घटनास्थळी भेट देऊन जळालेल्या उसाची पाहणी केली. बुधवारी सदलगगा हेस्कॉमचे अधिकारी एस. मडिवाल, निपाणी कृषी विभागाचे अधिकारी कौजलगी, आर. जी. डोमणे, मलगौडा पाटील, बाळासाहेब शिंदे यांनी जळीत उसाची पाहणी केली.