

सातारा : धर्मनिरपेक्षता हाच राष्ट्रवादाचा पाया आहे. स्वातंत्र्य चळवळीतून उत्क्रांत झालेल्या आपल्या संविधानावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कळस चढवला आहे, असे मत ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने ‘संविधान जागर ’विषय सूत्रावर नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये आयोजित केलेल्या 38 व्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत महात्मा फुले स्मृतीदिनी भारतीय राष्ट्रवाद व संविधान या विषयावरील उद्घाटनाचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे, उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह अॅड. हौसेराव धुमाळ उपस्थित होते. प्रारंभी महात्मा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. दिनकर झिंब्रे यांनी महात्मा फुले यांच्या क्रांतिकारक, आदर्श अशा मृत्युपत्रातील कौटुंबिक रक्त संबंधा ऐवजी वैचारिक वारसा जपणार्या संदेशाचे वाचन केले.
किशोर बेडकिहाळ म्हणाले, महात्मा फुले यांनी एकाच कुटुंबात विविध धर्मांच्या व्यक्ती गुण्यागोविंदाने नांदतील असे स्वप्न पाहिले. त्यामुळे त्यांना धर्मनिरपेक्षता कुटुंब व्यवस्थेचे जनक म्हणावे लागेल. त्यांनी अडचणीत सापडलेल्या महिलांना आश्रय देऊन मातृत्वाचा कृतीशील गौरवच केला आहे. भारतीय राष्ट्रवाद व संविधान शोषण विरोधी, द्वेषरहित मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान आहे. भारतीय संविधानाने लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांचा अंगीकार केला आहे. संविधानाचा हा आत्मा प्राणपणाने जपला पाहिजे.