

बेळगाव : आमदार आणि संचालक लक्ष्मण सवदी आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निंगराज करेण्णावर यांच्यावर केलेल्या कथित हल्ल्याचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. 5) बँकेसमोर निदर्शने केली.
कर्मचाऱ्यांनी बँकेसमोर जमून आमदार सवदी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांना निवेदन देत हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी विनंती केली.
आमदार सवदी लोकांसमोर खोटे बोलत आहेत. दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हल्ल्याची घटना सवदी यांच्या घरी घडली. त्यामुळे, त्यांनी त्यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे, असे आव्हान देण्यात आले
आमदार सवदी एक प्रभावशाली राजकीय नेते आहेत आणि या घटनेची निष्पक्ष चौकशी होण्याच्या शक्यतेबाबत आम्हाला शंका आहे. त्यामुळे, अथणी पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक आणि तालुका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर त्वरित योग्य कारवाई करावी. निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी माजी अध्यक्ष अप्पासाहेब यादगुडे व इतर अधिकारी उपस्थित होते.