बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे दरवर्षी परिसरातील हजारो एकरमधील पिकांचे नुकसान होते. त्यामुळे बळ्ळारी नाल्यातील अतिक्रमण हटवून ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी. अशी मागणी शेतकर्यांनी केल्याने मंगळवारी (दि.24) पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बळ्ळारी नाल्याला भेट देऊन पाहणी केली. तसेच नाल्याची समस्या मार्गी लावण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार राजू सेट उपस्थित होते.
दरवर्षी पावसाळ्यात बळ्ळारी नाल्याला येणार्या पुरामुळे परिसरातील हजारो एकरमधील पिकांचे नुकसान होत आहे. बळ्ळारी नाल्यात अतिक्रमण झाले असल्याने ही समस्या निर्माण होत आहे. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी पुराचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. पुराच्या पाण्यामुळे पिके कुजून शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेकवेळा मागणी करूनदेखील प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने बळ्ळारी नाल्याची पाहणी करण्यात यावी, अशी मागणी समिती नेते रमाकांत कोंडुसकर आणि शेतकर्यांनी केली होती. त्यामुळे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी अधिकार्यांसह बळ्ळारी नाल्याला भेट देऊन पाहणी केली.
शेतकर्यांच्यावतीने रमाकांत कोंडुसकर यांनी बळ्ळारी नाल्यामुळे होणार्या समस्यांची माहिती दिली. त्याचबरोबर नाल्यातील अतिक्रमण हटवण्याची मागणीही त्यांनी केली. शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेऊन बळ्ळारी नाल्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्री जारकीहोळी यांनी दिले. त्यामुळे शेतकर्यांतून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी कीर्तीकुमार कुलकर्णी, अमोल देसाई, मनोहर हलगेकर, माधुरी बिर्जे, लक्ष्मण बाळेकुंद्री, श्रीकांत पाटील, अनंत कणबरकर, संतोष शिवणगेकर, विठ्ठल पोळ, किरण सायनाक, बाळू आजरेकर, बाळू पाटील, विजय पाटील संदीप भोसले, प्रमोद कंग्राळकर, यल्लाप्पा तारिहाळकर आदी उपस्थित होते.