बेळगाव : बळ्ळारी पोलिसांनी सोडले, हुबळी पोलिसांनी पकडले

बेळगाव : बळ्ळारी पोलिसांनी सोडले, हुबळी पोलिसांनी पकडले
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  कुख्यात गुंडाला बळ्ळारी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी धारवाडला आणले. परंतु, तेथे त्याला त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी लॉजवर सोडून दिले. ही माहिती हुबळी पोलिसांना मिळताच त्यांनी त्याला लॉजमधून फरफटत नेऊन न्यायालयासमोर हजर केले.

काही महिन्यांपूर्वी बच्चेखान नामक कुख्यात गुंडाला बळ्ळारी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर धारवाड येथील न्यायालयात खटला सुरू होता. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी बळ्ळारी येथून चार पोलिस शनिवारी धारवाडला घेऊन आले होते.

प्रेयसीसाठी निवांत क्षण

बच्चेखान याने सोबत आलेल्या पोलिसांना मॅनेज केले. बंगळूरहून आपली गर्लफ्रेन्ड येणार आहे, तिला भेटण्याची परवानगी द्या, असे म्हणत त्याने या पोलिसांना बहुदा पैशाचे आमिष दाखवले. हे सर्व नियोजन पोलिसांना धरून आधीच झाले होते. यानंतर त्याने धारवाड येथे लॉजदेखील बुक केले. सदर गुंडाला पोलिसांनी त्याच्या प्रेयसीसोबत निवांत क्षण घालवण्यासाठी लॉजमध्ये सोडले.

कालीमिर्ची यांची कारवाई

खतरनाक गुंड लॉजमध्ये आल्याची माहिती हुबळी गोकुळनगर रोड ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांना मिळाली. त्यांनी सहकार्‍यांसह जाऊन या गुंडाच्या मुसक्या आवळल्या. त्याला फरफटत आधी पोलिस ठाण्याकडे नेले व त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले. विशेष म्हणजे गुंड कुठे पळून जाऊ नये, म्हणून बळ्ळारीचे पोलिस लॉजखालीच त्याची प्रतीक्षा करत होते. परंतु, त्यांनाही याचा थांगपत्ता लागला नाही. हे सर्व पूर्वनियोजन करून एका गुंडाला साथ दिल्याचा ठपका ठेवत या चौघा पोलिसांना बळ्ळारी जिल्हा पोलिसप्रमुखांनी निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. एका संशयिताला अशा प्रकारची मुभा देण्यात आल्याबाबत संबंधित पोलिसांची खरडपट्टी करण्यात आली आहे. इतर पोलिसांनाही याबाबत इशारा देण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news