'हा भारत आहे, मी हिंदीतच बोलेन, कन्नड नाही'; कर्नाटकात भाषा वादाला फुटलं तोंड, Video व्हायरल
Karnataka Language Row
कर्नाटकात कन्नड विरुद्ध हिंदी असा नवीन एक वाद निर्माण झाला आहे. येथील अनेकल तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका शाखेत ग्राहकाशी बोलताना एका अधिकाऱ्याने कन्नड बोलण्यास नकार दिला. यामुळे कन्नड-हिंदी भाषा वादाला तोंड फुटले आहे. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात एक ग्राहक कन्नडमध्ये बोलण्यास पुन्हा पुन्हा सांगत असून त्याला बँकेतील महिला अधिकारी नकार देत असल्याचे दिसून येते.
या व्हिडिओत ग्राहक, 'मॅडम, हे कर्नाटक आहे,' असे म्हणतो. त्यावर अधिकारी उत्तर देते, 'हा भारत देश आहे.' जेव्हा त्यांना, 'मॅडम, कन्नडमधून बोला', असे सांगितले जाते; तेव्हा त्या उत्तर देतात, 'मी तुमच्यासाठी कन्नड का बोलू...? मी हिंदीमध्ये बोलेन.'
यावरुन दोघांमध्ये वाद वाढतो. तेव्हा त्या महिला अधिकारी, 'मी कधीही कन्नड बोलणार नाही" असे म्हणत तेथून निघून जातात. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक यूजर्संनी हा व्हिडिओ शेअर करत तो केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला टॅग केला आहे. त्यांनी याबद्दल हिंदी लादल्याचा, ग्राहकांशी चुकीच्या पद्धतीने वर्तन आणि आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप अधिकाऱ्यावर केला आहे. काही यूजर्सनी कन्नड भाषेचा अपमान केल्याचाही आरोप केला आहे.
वादानंतर महिला अधिकाऱ्यांचा माफीनामा
या वादानंतर जारी केलेल्या एका व्हिडिओत सदर एसबीआय अधिकारी एका सहकारी कर्मचाऱ्याच्या मदतीने कन्नडमधून माफी मागताना दिसते. 'जर माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून त्यांची माफी मागते.' असे त्या व्हिडिओत म्हणतात.
थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी घेतली दखल
एवढेच नाही तर थेट कर्नाटक सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत X वर पोस्ट करत बँक अधिकाऱ्याचे अशाप्रकारचे वर्तन अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले.
''अनेकल तालुक्यातील सूर्या नगर येथील एसबीआय शाखा व्यवस्थापकाने कन्नड आणि इंग्रजीतून बोलण्यास नकार देणे आणि नागरिकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. सदर अधिकाऱ्याच्या बदलीसाठी एसबीआयने तत्त्काळ पाऊल उचलले. त्याबद्दल आम्ही एसबीआयचे कौतुक करतो. आता या वादावर पडदा पडला असे आम्ही समजू. दरम्यान, अशा घटना पुन्हा घडू नयेत. यासाठी सर्व बँक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागले पाहिजे. त्यांच्याशी त्यांनी स्थानिक भाषेत बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा, असे सिद्धरामय्या यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

