बेळगाव: गणेबैल टोल नाक्यावर काँग्रेसचा रास्ता रोको | पुढारी

बेळगाव: गणेबैल टोल नाक्यावर काँग्रेसचा रास्ता रोको

बेळगाव: पुढारी वृत्तसेवा: टोलनाक्यावर लोकल गाड्यांना दिला जाणारा त्रास थांबवा, ५ किमीच्या आतील अंतरातील सर्व लोकल वाहनांना टोल माफी मिळावी, आदी मागण्यांसाठी मंगळवारी (दि. 28) काँग्रेस कार्यकर्त्यांनी गणेबैल टोल नाक्यावर आंदोलन करून सुमारे सव्वादोन तास रास्ता रोको केला. या प्रकरणी कार्यवाही न झाल्यास १० जूनरोजी काँग्रेसच्या वतीने जेल भरो आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.

या आंदोलनामुळे टोल नाक्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. टोलमधून सुट नसताना दादागिरी करून टोलमाफी मिळविली आहे का ? आमदार साहेब यासंदर्भात काही बोलतील का ? असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

यावेळी तात्पुरती व्यवस्था म्हणून लोकल गाड्यांना सहकार्य करण्याची भूमिका पोलीस प्रशासन व टोल व्यवस्थापनाने घेतली. तसेच ज्या -ज्या बीजेपीच्या लोकांच्या गाड्या गणेबैल टोल नाक्यावरून टोल न भरता सोडून दिल्या जात होत्या. त्या सर्व गाड्यांविरूद्ध तसेच टोल अधिकाऱ्यांविरूद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.

यावेळी ॲड. ईश्वर घाडी, सुरेश भाऊ, यशवंत बीरजे, विनायक मुतगेकर, प्रसाद पाटील, जोतीबा गुरव, महादेव गुरव, रामचंद्र पाटील, रूद्राप्पा पाटील, तोहीत चांदखन्नावर, इसाक पठाण, रमेश पाटील, वासुदेव चौगुले, विवेक गिरी, प्रसन्ना कुलकर्णी आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button