बेळगाव: सांबरा मैदानात नेपाळच्या देवा थापाच्या कुस्तीची रंगत

सांबरा मैदान
सांबरा मैदान

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा: सांबरा येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाची नेपाळचा प्रसिद्ध मल्ल देवा थापाच्या कुस्तीने रंगत वाढवली. सात मिनिटे रंगलेल्या या कुस्तीतील डाव- प्रतिडावांना कुस्तीप्रेमींनी उत्स्फूर्त दाद दिली.

सांबरा मैदानात लहानमोठ्या ८० कुस्त्यांची उपस्थितांना मेजवानी मिळाली. मात्र, सर्वाधिक उत्सुकता देवा थापाच्या कुस्तीची होती. शुक्रवारी रात्री १०.३० वाजता यू ट्यूबवर गाजत असलेला नेपाळचा पैलवान देवा थापा वि. अमितकुमार हरियाणा यांच्यात कुस्ती झाली. यावेळी देवा थापाच्या शरीराची लवचिकता आणि अनोखे डावपेच पाहून टाळ्यांच्या गजरात दाद दिली जात होती. कुस्तीप्रेमींची नजर खिळवून ठेवणाऱ्या या कुस्तीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

देवा थापाची कुस्ती बेळगावात दुसऱ्यांदा होत असल्याने कुस्ती शौकिनांना कुतूहल होते. या कुस्तीचे उपस्थितांकडून मोबाईलवर चित्रीकरण केले जात होते. देवा, देवा अशा आरोळ्याही घुमत होत्या. देवा थापा याने कुस्ती सुरू होण्याआधी दोन मिनिटे मनोगत व्यक्त करून बेळगाव परिसरातील कुस्तीप्रेमींचे आभार मानले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news