बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात हत्तीची दहशत | पुढारी

बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात हत्तीची दहशत

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दिवसांपासून बेळगाव- चंदगड तालुक्याच्या सीमेवर एका हत्तीची दहशत सुरू आहे. हा हत्ती सोमवारी (दि.२७) मध्यरात्रीनंतर बसुर्ते फाटा येथे दिसून आला. बेकिनकेरे येथील काही तरूण मध्यरात्री १ वाजता कामावरून घरी जात होते. यावेळी या परिसरात त्यांना हत्तीचे दर्शन झाले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

कर्नाटक वनखात्याच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी (दि.२७) बसुर्ते फाटा येथील एका मक्याच्या शेतात या हत्तीच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी शिवारात जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वन अधिकारी यांनी केले आहे. चंदगड – पाटणे वन कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे, वनपाल जॉन्सन डिसोजा, बेळगाव येथील वन कार्यालयाचे आरएफओ पुरुषोत्तम राव, डेप्युटी आरएफओ रमेश गिरीयपन्नावर, बीट फॉरेस्टर राहुल बोंगाळे, बीट फॉरेस्टर जे. बी. रजपूत, बीट फॉरेस्टर सुदर्शन कोलकाता, नेताजी धामणकर, विश्वनाथ नार्वेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

महिपाळगड जंगलात हत्ती स्थिरावल्याची शक्यता

महाराष्ट्र वन अधिकारी तसेच कर्नाटकचे वन अधिकारी यानी संयुक्तपणे घटनास्थळी भेट दिली. यानंतर परिसरातील अंदाज घेत त्यांनी जवळ असणाऱ्या महिपाळगड जंगलात हा हत्ती गेल्याची शक्यता वर्तवली आहे. महिपाळगडाच्या शेजारी घनदाट जंगलातच हत्ती वास्तव्य करू शकतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने गव्यांचे कळप आहेत. त्यामुळे हा हत्ती महिपाळगड जंगलात रवाना होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच शेजारी असणाऱ्या सुंडी, कौलगे तसेच बुक्कीहाळ येथे पाझर तलाव आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने हा हत्ती परिसरात स्थिरावला असल्याचीही शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा :

Back to top button