कोल्हापूर : उसने दिलेल्या पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने सोनाराचा खून; चंदगडमधील घटना

कोल्हापूर : उसने दिलेल्या पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने सोनाराचा खून; चंदगडमधील घटना

चंदगड; पुढारी वृत्तसेवा :  उसने घेतलेले पैशाच्या वादातून तुडये येथील सोनाराची धारदार विळ्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित आरोपी रमेश बाबू पाटील याला चंदगड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

बाळकृष्ण सोनार ( सध्या रा.तुडये, मूळ गाव कालकुंद्री ता. चंदगड, जि. कोल्हापूर वय ६०) हे सोने चांदीचे खरेदी, विक्रीचे व्यापारी आहेत. गावागावात फिरून ते सोने चांदीची विक्री करतात. रमेश बाबू पाटील  (वय ४५ रा. तुडये ता. चंदगड ) या संशयीताने बाळकृष्ण सोनार यांच्याकडून काही दिवसांपूर्वी १ लाख ३० हजार रुपये उसने घेतले होते. अनेक वेळा पैशासाठी तगादा लावूनही रमेश याने पैसे दिले नाहीत.

दरम्यान आज मंगळवारी दुपारी १ वाजता धामणे – कर्नाटक हद्दीतून वाघजाई स्वप्नवेल पॉईंटकडे जाणाऱ्या डोंगरात मोटरसायकल वरून रमेश याने बाळकृष्णला नेले. व मध्यस्थामार्फत आपला प्रश्न सोडवूया असे खोटे बोलून त्याला गुळम्ब गावच्या हद्दीत स्वप्नवेल पॉईंटकडे नेले. त्यानंतर घनदाट जंगलात त्यांच्यावर विळ्याने सापासप प्राणघातक हल्ला केला. यामध्ये बाळकृष्ण गंभीर जखमी अवस्थेत पडले. घाबरलेल्या रमेशने घराकडे पलायन केले. जखमी अवस्थेत असलेल्या बाळकृष्ण यांनी आपल्या मोबाईलवरून चंदगड पोलिसांना ही माहिती दिली. आपण कुठे आहोत याची माहिती दिल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आणि दुसरे पथक रमेश याला पकडण्यासाठी तुडये येथे दाखल झाले. रक्ताने माखलेले कपडे धुत असताना रमेश याला पोलिसांनी अटक केली. बाळकृष्ण यांच्या मागे मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

चिमणीवाला सोनार म्हणून ओळख

तुडये पंचक्रोशीत बाळकृष्ण सोनार यांची चिमणीवाला सोनार म्हणून ओळख आहे. सोने, चांदीची घरोघरी जाऊन विक्री करत होते. दिवस, असो किंवा रात्र ते रॉकेलच्या दिव्याखालीच आपला व्यवसाय करीत होते. अचानकपणे वीज गेलीच तर चिमणी ( दिवा ) प्रकाश मिळावा म्हणून ते दिवा घेऊनच फिरत असत. म्हणून त्यांची ओळख
चिमणीवाला सोनार म्हणून होती.

रक्ताने माखलेले कपडे धुताना अटक

खून झाल्यानंतर रमेश याने तुडये येथे आपल्या राहत्या घरी पलायन केले. रक्ताने माखलेले कपडे बाथरूम मध्ये धूऊन अंघोळ करीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणखीन थोडा जरी उशीर झाला असता तर रमेश फरारी झाला असता, असे पो. नि. नितीन सावंत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news