बेळगाव : महापालिकेकडून पुन्हा मराठीला बगल; ठराव करूनही सर्वसाधारण सभेची नोटीस कन्नड, इंग्रजीत | पुढारी

बेळगाव : महापालिकेकडून पुन्हा मराठीला बगल; ठराव करूनही सर्वसाधारण सभेची नोटीस कन्नड, इंग्रजीत

जितेंद्र शिंदे

बेळगाव : जुलै महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेची कागदपत्रे इतर भाषेसह मराठी भाषेतूनही देण्याचा ठराव संमत केला होता. पण महिनाभरातच महापालिका प्रशासनाने मराठीच्या ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. १६ ऑगस्टला होणाऱ्या सर्वसाधारण सभेची नोटीस फक्त कन्नड आणि इंग्रजीमध्ये काढली असून मराठी नोटिसीला बगल देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे.

महापालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा १६ ऑगस्टला होणार आहे. याबाबत शुक्रवारी (दि.११) रात्री उशिरा नगरसेवकांना नोटीस पाठवण्यात आली. पण ही नोटीस केवळ कन्नड आणि इंग्रजीमध्ये आहे. गेल्याच सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र एकीकरण समितीतील नगरसेवकांच्या मागणीनुसार मराठी भाषेतही महापालिकेचे कामकाज चालेल, असा ठराव संमत करण्यात आला आहे.

सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नितीन जाधव यांनी महापालिकेने मराठी भाषेतही कागदपत्रे द्यावीत. मराठी कागदपत्रावरून काहीजण विनाकारण राजकारण करत आहेत, असा आरोप केला होता. त्यानंतर महापौर शोभा सोमनाचे यांनी यापुढील महापालिकेच्या कामकाजासाठी तिन्ही भाषेत कागदपत्रे देण्यात येतील, असा ठराव केला होता. पण या घटनेला महिना होण्याआधीच बगल देण्यात आली आहे. मराठी भाषेतून कागदपत्रे देण्याच्या ठरावाला केराची टोपली दाखवली असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या विषयावर सर्वसाधारण सभेत पुन्हा वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

     

     हेही वाचलंत का ?

Back to top button