

पुढारी ऑनलाईन : कर्नाटक विधानसभा निवडणूक तोंडावर असताना माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. लक्ष्मण सवदी यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर लगेच एका दिवसानंतर त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला. लक्ष्मण सवदी हे अथणीचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. पण २०१८ मधील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार महेश कुमठळ्ळी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. काँग्रेसमधील इतर नेत्यांसह कुमठळ्ळी नंतर भाजपमध्ये सामील झाले. यामुळे काँग्रेस-जेडीएस युती सरकार पडले आणि २०१९ मध्ये बी एस येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले होते. (Karnataka Assembly elections 2023)
आता अथणीतून सवदी यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय असलेले कुमठळ्ळी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. "मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे", असे सवदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी सांगितले की ते गुरुवारी संध्याकाळी ठोस निर्णय घेतील आणि शुक्रवारपासून काम सुरू करेन.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी लक्ष्मण सवदी यांच्याशी बोललो आहे आणि त्यांना कोणताही घाईघाईने निर्णय घेऊ नये असे सांगितले आहे." असे बोम्मई यांनी म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, त्यात ५२ नवीन चेहरे आहेत. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना शिग्गाव आणि येडियुराप्पा यांचे चिरंजीव विजयेंद्र यांना शिकारीपुरा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. या यादीत ५२ उमेदवार नवे आहेत. दुसरीकडे ३२ उमेदवार ओबीसी, २० उमेदवार अनुसूचित जाती तर १६ उमेदवार अनुसूचित जमातीमधले आहेत.
डॉ. रवी पाटील (बेळगाव उत्तर), शशीकला जोल्ले (निपाणी), विठ्ठल हलगकेर (खानापूर), अभय पाटील (बेळगाव दक्षिण), नागेश मन्नोळकर (बेळगाव ग्रामीण), श्रीमंत पाटील (कागवाड), बसवराज हुंद्री (यमकनमर्डी), रमेश कत्ती (चिकोडी), निखिल कत्ती (हुक्केरी), महेश कुमठळ्ळी (अथणी), पी. राजीव (कुडची), दुर्योधन ऐहोळे (रायबाग), रमेश जारकीहोळी (गोकाक), महांतेश दोड्डगौडर (कित्तूर), जगदीश मेटगूड (बैलहोंगल), रत्ना मामणी (सौंदत्ती), चिक्क रेवण्णा (रामदुर्ग), भालचंद्र जारकीहोळी (अरभावी). (Karnataka Assembly elections 2023)
हे ही वाचा :