Karnataka Election 2023 | काँग्रेसकडून निपाणीतून सहाव्यांदा काकासाहेब पाटील यांना उमेदवारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष | पुढारी

Karnataka Election 2023 | काँग्रेसकडून निपाणीतून सहाव्यांदा काकासाहेब पाटील यांना उमेदवारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

निपाणी: पुढारी वृत्तसेवा; अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने निपाणी विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल सहाव्यांदा काकासाहेब पाटील यांच्यावर सार्थ विश्वास दाखवत जुनं ते सोनं म्हणत त्यांनाच पक्षाची उमेदवारी दिली आहे. गेली काही महिने या उमेदवारीवरून मोठे वादंग चालू होते. यामध्ये अनेकांकडून दावा केला जात असला तरी काकासाहेब पाटील यांनी पक्ष आपल्यावर विश्वास ठेवेल असे सांगत कार्यकर्त्यांना उमेदवारीबाबत खात्री दिली होती. त्याचा अपेक्षित निर्णय गुरुवारी लागला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी साखरवाडी येथील पक्ष कार्यालयात गर्दी करून प्रत्यक्ष काकासाहेब पाटील यांची भेट घेऊन एकच जल्लोष केला. (Karnataka Election 2023)

कर्नाटक विधानसभेसाठी 124 उमेदवारांची पहिली यादी मागील शनिवारी जाहीर झाली होती. पक्षाचे जनरल सेक्रेटरी आणि निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांनी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये काकासाहेब पाटील यांचे नाव असल्याने आता अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. 1999 ते 2013 या सालात सलग तीन वेळा प्रचंड मताधिक्य घेऊन काकासाहेब पाटील यांनी विजय मिळवला. पण 2013 पासून सलग दोनवेळा त्यांना निसटत्या मताधिक्याने पराभव पत्करावा लागला.

त्यामुळे या वेळेला त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. पण विरोधी बाकावरचा आमदार असूनही त्यांनी काँग्रेसची पक्षांतर्गत केलेली विकासकामे आणि संपादन केलेला पक्षनेतृत्वाचा विश्वास याच्या जोरावर निवड यादीवरून त्यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. काकासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपकडून शशिकला जोल्ले यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. असे असले तरी आता काही बंडखोरी आणि महाराष्ट्र एकीकरण समिती, आम आदमी पक्ष रयत संघटना यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी सकाळी माजी आ. काकासाहेब पाटील यांनी गुरुवारी सकाळी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करून निवडणुकीबाबत चर्चा केली. यावेळी माजी आ.वीरकुमार पाटील चिकोडी जिल्हा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे हे उपस्थित होते. (Karnataka Election 2023)

 हे ही वाचा :

Back to top button