Belgaum News : निपाणीत आढळले पुरुष जातीचे अर्भक; डॉक्टर दाम्‍पत्यामुळे जीवदान | पुढारी

Belgaum News : निपाणीत आढळले पुरुष जातीचे अर्भक; डॉक्टर दाम्‍पत्यामुळे जीवदान

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : निपाणी बुदलमुख (पांगीरे) येथील शेतवडीतील गवतात आज (दि. २४) सकाळी पुरुष जातीचे पाच दिवसांचे अर्भक आढळले.  न्यू हुडको कॉलनी येथील रहिवाशी डॉ. मारुती मोरबाळे यांना ते आढळलं. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती शहर पोलीसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर अर्भकाला महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. सध्या अर्भकाची प्रकृती चांगली आहे. या अर्भकाला दत्तक घेण्यासाठी अनेक निपुत्रिक जोडपी (Belgaum News) पुढे आली आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, डॉ. मोरबाळे दाम्‍पत्य नेहमीप्रमाणे हुडको कॉलनी येथून पांगीरे रोडला मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. या मार्गावर असलेल्या महादेव मंदिर शेजारील रस्त्याच्या बाजूला त्‍यांना बाळ रडत असल्‍याचा आवाज आला. मोरबाळे दांपत्याने पाहिले असता गवतात एका प्लास्टिक बास्केटमध्ये लाल व पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेले चार ते पाच दिवसाच्या पुरुष जातीचे अर्भक दिसून आले.

अर्भक सुखरुप

 डॉ. मोरबाळे दाम्‍पत्‍याने याची माहिती तातडीने शहर पोलिसांना दिली. उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांच्यासह ठाणे अंमलदार के. बी. दडी, हवालदार एम. बी. कल्याणी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. र्भक सुखरूप असल्याची खातरजमा करून याची माहिती बालकल्याण खात्याच्या निरीक्षक डी. बी. सुमित्रा यांना दिली. पोलीस व बालकल्याण विभागाने तातडीने अर्भकाला उपचारासाठी सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात हलवले. दरम्यान, अर्भक मिळाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने अनेक निपुत्रिक जोडप्यांनी सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात धाव घेऊन अर्भकाला आपण दत्तक घेऊ, अशी विनंती पोलीस व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. प्रशासनाने अर्भकावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील पाळणागृहात दाखल केले.

Belgaum News :तर्कवितर्कांना उधाण 

गुरुवारी सकाळी अर्भक आढळले. निर्जन असणाऱ्या परिसरात सदरचे अर्भक आढळून आल्याने याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. प्रशासनाने सदर अर्भक अनैतिक संबंधातून जन्मले असावे की त्याचे अपहरण झाले असावे ? असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरु असल्‍याची  उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button