बेळगाव : पत्नीची छेड काढणाऱ्यास जाब विचारणाऱ्या पतीचा खून, संशयित ताब्‍यात | पुढारी

बेळगाव : पत्नीची छेड काढणाऱ्यास जाब विचारणाऱ्या पतीचा खून, संशयित ताब्‍यात

खानापूर; (बेळगाव) : पुढारी वृत्तसेवा वारंवार आपल्या पत्नीचा पाठलाग करून छेड काढणाऱ्या तरुणास जाब विचारणाऱ्या पतीवर चाकूने सपासप वार करून त्‍याचा खून करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. खानापूर शहरातील बाहेर गल्ली आश्रय कॉलनी येथे ही घटना घडली. मारुती उर्फ कृष्णा गणूराव जाधव (वय 40) असे खून झालेल्‍याचे नाव आहे. प्रशांत दत्तात्रय नार्वेकर (35) असे संशयित हल्लेखोराचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत खानापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती व प्रशांत यांची घरे आश्रय कॉलनी येथे एकाच गल्लीत आहेत. गेल्या वर्षभरापासून प्रशांत मारुतीच्या पत्नीला वाईट नजरेने बघत होता. रस्त्याने जाताना तिचा पाठलाग करणे. छेडछाड करणे अशा प्रकारांमुळे मारुतीने त्याला समज दिली होती. हाच राग मनात धरून रविवारी रात्री जेवणानंतर गल्लीत शतपावली घालत असलेल्या मारुतीवर त्याने हल्ला केला. काठीने डोक्यात वार करून त्याला खाली पाडले. त्यानंतर चाकू पोटात भोसकला. गळा व मानेवरही सपासप वार केले. यात मारुतीचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर गल्लीत एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रशांत घटनास्थळीच बसलेला दिसून आला. मारुतीने आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे असे भासवण्यासाठी त्याने मारुतीच्या एका हातात कुऱ्हाड आणि एका हातात तलवार दिल्याचे पोलिसांना दिसून आले. रात्री दोन वाजता बैलहोंगल विभागाचे डीएसपी शिवानंद कटगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव सिव्हिल इस्पितळात फॉरेन्सिक तज्ञांच्या उपस्थितीत मारुतीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली जाणार आहे. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा :  

Back to top button