पुढारी ऑनलाईन: टीम इंडिया सध्या T20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. खेळाडूंच्या जेवणाची गैरसोय होत असल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले होते. आता खेळाडूच्या प्रायव्हसीसंदर्भातील एक घटना समोर आली आहे. (Virat on privacy) यासंदर्भात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याने आपल्या इन्टावर एक व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विराट थांबलेल्या हॉटेलमधील रूमचा व्हिडीओ एका चाहत्याने शूट करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यावर विराट कोहलीने संबंधित चाहत्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, आपल्यासाठी प्रायव्हसी किती महत्त्वाची आहे, हेही स्पष्ट केले आहे.
विराटने हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत म्हटले आहे की, मला समजते की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहून खूप आनंदी आणि उत्साही होतात. ते नेहमीच आम्हाला भेटायला उत्सुक असतात. मी नेहमीच त्यांचा आदर केला आहे; परंतु येथे हा व्हिडीओ भयावह आहे. यामुळे मला माझी प्रायव्हसी खूप महत्त्वाची वाटते, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
मला माझ्या स्वतःच्या हॉटेलच्या रूममध्ये प्रायव्हसी ठेवता येत नसेल, तर मी माझ्या वैयक्तिक ठिकाणी प्रायव्हसी कशी ठेवू. प्रायव्हसीसाठी कुठल्या जागेची अपेक्षा करू? असाही प्रश्न किंग कोहलीने उपस्थित केला आहे. मी अशा प्रकाराच्या विरूद्ध आहे. तरी कृपया लोकांचा आणि त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करा. त्यांना मनोरंजनाची वस्तू समजू नका, असे म्हणत किंग कोहलीने संबंधित चाहत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली किंवा भारतीय संघ वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सिडनीमध्ये भारतीय संघाला थंड सँडविच खायला मिळाले होते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी ते खाण्यास नकार दिला. या प्रकरणावरून बराच गदारोळही झाला आणि नंतर आयसीसीला या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे लागले. आता विराटच्या खोलीत एका चाहत्याने प्रवेश केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की, कोणत्याही खेळाडूच्या खोलीत जाऊन कोणीतरी व्हिडिओ बनवतो आणि तो सोशल मीडियावर व्हायरल होतो. त्यामुळे खेळाडूची सुरक्षा किती मजबूत आहे? ही चिंतेची बाब आहे.