

मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी हे ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते नेहमीच आपल्या रोखठोक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात.
Maulana Razvi on New Year Celebration
नवी दिल्ली : नववर्ष प्रारंभाला आता अवघे काही तास राहिले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरात उत्साहाचे वातावरण असून, अनेकांनी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा बेतही आखला आहे. मात्र, ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला कडाडून विरोध दर्शवला आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करणे इस्लामिक कायद्यानुसार (शरियत) ‘नाजायज’ म्हणजेच अनैतिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी हिंदू परंपरांचाही उल्लेख केला आहे.
वृत्तसंस्था ‘एएनआय’शी बोलताना मौलाना रजवी म्हणाले, “३१ डिसेंबरच्या रात्री लोक सामान्यतः गोंगाट, नाच-गाणी आणि अभद्र वर्तनाद्वारे जल्लोष करतात. अशा प्रकारचे कृत्य पूर्णपणे चुकीचे आहे.”
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर आक्षेप घेताना मौलाना रजवी म्हणाले की, “इस्लामिक शरियतनुसार अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी करणे निषिद्ध आहे. शरियतमध्ये अशा कृतींना परवानगी नाही. इस्लामिक कॅलेंडरनुसार, नवीन वर्षाची सुरुवात जानेवारीत होत नाही, तर ती ‘मोहरम’ महिन्यापासून होते. त्यामुळे जानेवारीत नववर्ष साजरे करणे अयोग्य आहे. कोणत्याही परिस्थितीत तरुणांनी पार्ट्यांमध्ये सहभागी होऊन नाच-गाणे आणि उधळपट्टी करू नये. जर कोणी अशा प्रकारे जल्लोष करत असेल, तर धार्मिक विद्वान अशा समारंभांवर कडक निर्बंध लादतील,” असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी मौलाना रजवी यांनी हिंदू परंपरांबाबतही विधान केले. ते म्हणाले, “केवळ इस्लामच नव्हे, तर हिंदू संस्कृतीतही नवीन वर्षाची सुरुवात ‘चैत्र’ महिन्यापासून होते.”
मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी हे ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते नेहमीच आपल्या रोखठोक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी बांगलादेशातील परिस्थितीवरही भाष्य केले होते. त्यांनी बांगलादेशातील हिंसाचाराचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. कोणत्याही देशात अराजकता माजणे हे मानवता आणि लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले होते. तसेच त्यांनी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत मोठी चिंता व्यक्त केली होती. इस्लाममध्ये अल्पसंख्याकांच्या मालमत्तेचे आणि जीवनाचे संरक्षण करणे हे बहुसंख्याकांचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी ठणकावले होते. दरम्यान, मागील वर्षीही मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला अशाच प्रकारे विरोध दर्शवला होता.