न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार ; महाराष्ट्र एकीकरण समितीचा मराठीतून कागदपत्रांसाठी मोर्चा | पुढारी

न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार ; महाराष्ट्र एकीकरण समितीचा मराठीतून कागदपत्रांसाठी मोर्चा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारचा कायदा, भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या तरतुदी आणि उच्च न्यायालयाचा निकाल असतानाही सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे मिळत नाहीत. सरकार आणि प्रशासनाचा हा दुजाभाव यापुढे खपवून घेणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार, असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हा प्रशासनाला दिला.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मराठी कागदपत्रे मिळावीत. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सकाळी 11.30 वाजता सरदार्स मैदानावरून कॉलेज रोड मार्गे मोर्चाला प्रारंभ झाला. कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासह मराठी कागदपत्रांच्या मागण्यांच्या घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चामध्ये म. ए. समितीसह शिवसेना, युवा आघाडी, महिला आघाडी, युवा समिती आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

समितीच्या वतीने 1 जून रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन मराठीतून कागदपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत कागदपत्रे देण्याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांना गेल्या अठरा वर्षांत मराठीचे हक्‍क देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्याचा निर्धारासाठी हा मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा

Back to top button