कर्नाटक : इलेक्ट्रिक कॉईलचा शॉक बसून तरुणी ठार | पुढारी

कर्नाटक : इलेक्ट्रिक कॉईलचा शॉक बसून तरुणी ठार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
आंघोळीसाठी बादलीत लावलेल्या इलेक्ट्रिक कॉईलचा शॉक बसून तरुणीचा मृत्यू झाला. देवांशी योगेंद्र चव्हाण (वय 17, मूळ रा. श्रीशैलनगर सोलापूर, महाराष्ट्र, सध्या रा. आनंदनगर, वडगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे.

देवांशी ही मूळची सोलापूर येथील असून गेल्या आठवड्यात ती आपल्या मामाच्या गावी आली होती. मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. यावेळी स्टीलच्या बादलीत इलेक्ट्रिक कॉईल लावलेली होती. ती आत गेल्यानंतर पाणी तापले आहे का, हे पाहण्यासाठी बहुदा पाण्यात हात घातला असता तिला जोराचा विजेचा शॉक बसला. यामध्ये ती मृत झाली.

वीस मिनिटे झाली तरी मुलगी बाहेर येत नाही म्हणून, तिची आई तृप्ती चव्हाण यांनी दरवाजा ठोठावला. परंतु, आतून काहीच प्रतिसाद आला नाही. दरवाजा मोडून काढला असता सदर तरुणी कोसळलेल्या अवस्थेत दिसून आली. तिला विजेचा शॉक इतक्या जोरात बसला होता की तिच्या उजव्या हाताची चार बोटे निकामी झाली होती. तिला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. शहापूर पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून पोलिस निरीक्षक विनायक बडिगेर तपास करत आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button