बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : होय, याच चन्नम्मा चौकात मी आंदोलन केलंय. कन्नडसक्तीविरोधात ते आंदोलन होते…, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पवार आज मंगळवारपासून (दि. 10) बेळगाव जिल्हा दौर्यावर आहेत. दोन दिवसांत विविध कार्यक्रमांत ते सहभाग घेणार आहे. मंगळवारी सकाळी ते कोल्हापूर मार्गे बेळगावात दाखल झाले. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली.
अमित देसाई यांनी पवार यांना बेळगावचे चित्रकार महेश होनुले यांनी रेखाटलेले चन्नम्मा चौकाचे चित्र भेटीदाखल दिले. हे चित्र पाहताच पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, याच चन्नम्मा चौकात मी आंदोलन केले. कन्नडसक्तीविरोधात आंदोलनाच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. पोलिसांनी लाठीमार केला, त्यानंतर मला अटक झाली होती, असे त्यांनी सांगितले. यावेळी सीमाप्रश्नासंदर्भात अमित देसाई यांच्यासह विक्रांत होनगेकर व जोतिबा पाटील यांच्याशी चर्चा केली.
शरद पवार बुधवारी (दि. 11) ज्योती महाविद्यालयात आयोजित दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा सांगता महोत्सवात सहभागी होणार असून त्यानंतर मध्यवर्ती म. ए. समिती नेत्यांशी सीमाप्रश्नावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे म. ए. समितीच्या युवकांसोबत साधलेले आजचे हितगूज महत्वाचे ठरले आहे.
बेळगाव दौर्यावर आलेल्या शरद पवार यांनी आज सकाळी गोगटे कुटुंबियांची भेट घेतली. प्रसिद्ध उद्योजक अरविंद गोगटे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी मंगल गोगटे, चंदगडचे आमदार राजेश पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचलंत का?