

1000 flags were sold from the Khadi store
निपाणी : पुढारी वृत्तसेवा
येथील खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या दुकानातून दोन दिवसांत तब्बल १००० ध्वजांची विक्री झाली असल्याची माहिती येथील खादी ग्रामोद्योग विक्री केंद्राचे व्यवस्थापक श्रीकांत पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनी चांगला प्रतिसाद मिळात आहे. यात अनेकांनी यापूर्वी खरेदी केलेले तिरंगी ध्वज जपून ठेवले आहेत. त्यामुळे यंदाही ध्वज खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी हर घर तिरंगा हा उपक्रम राबवून देश प्रेम जागृत ठेवले आहे.
खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या विक्री केंद्र (दुकानात) शासकीय कार्यालये, संघ, संघटनांनी ध्वजाची नोंदणी केली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांमध्ये विविध आकारातील तब्बल १००० ध्वजांची विक्री झाली आहे. यातून खादी ग्रामोद्योग महामंडळाला ३ लाख रुपयांचा महसूल मिळाला असल्याचे पाटील यांनी सांगितले.
विविध आकारामध्ये कर्नाटक खादी ग्रामोद्योग फेडरेशन संघाने ठरवून दिलेल्या दरानुसार विक्री झाली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास १५ हजार ध्वजांची विक्री झाली आहे. विशेष करून खादी ग्रामोद्योग महामंडळाच्यावतीने वितरित होणाऱ्या ध्वजालाच प्रतिसाद मिळत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.