

Two brothers were murdered due to financial reasons
कारवार : पुढारी वृत्तसेवा
आर्थिक कारणावरून मित्रांनी दोघा सख्ख्या भावांची निघृण हत्या केल्याची घटना होन्नावरमध्ये उघडकीस आली आहे. दोन भावांना विष मिसळलेली दारू पाजून त्यानंतर त्यांच्या कारला अपघात झाल्याचे भासवण्यात आले होते. याप्रकरणी तिघा संशयितांना होन्नावर पोलिसांनी अटक केली आहे.
मंजुनाथ वीरभद्र हसलर आणि चंद्रशेखर वीरभद्र हसलर (रा. कुडगुंडा, ता. सिद्धापूर, जि. कारवार) अशी मृत भावांची नावे आहेत. प्रमोद नायक, सन्या नायक आणि हेमंत नायक (रा. होन्नावर) अशी तीन संशयितांची नावे आहेत. हे सगळे एकमेकांचे मित्र होते.
कारवार जिल्ह्यातील होन्नावर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६ आणि ७ जानेवारी रोजी सुरली-मुरकीजवळ एका मारुती सुझुकी कारचा अपघात झाला. त्यात दोन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळले होते. होन्नावर पोलिस निरीक्षक सिद्धरामेश्वर आणि पथकाने घटनास्थळी तपास करून सुरुवातीला अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र दोन्ही मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने हा अपघात नसून खून असल्याचा संशय व्यक्त झाला. त्यानंतर मंजुनाथ आणि चंद्रशेखर यांच्या घरच्यांची कसून चौकशी करण्यात आली. तपास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आला. त्यात आर्थिक कारणांमुळे दोघांची हत्या झाली असल्याचे निष्पन्न झाले.
प्रमोद नायक, सन्या नायक आणि हेमंत नायक यांना ताब्यात घेऊन या संदर्भात चौकशी केली असता हत्यांचे गूढ उकलले. चंद्रशेखर आणि त्याचा मित्र प्रमोद नायक यांच्यात आर्थिक बाबींवरून भांडण झाले होते. याच कारणामुळे चंद्रशेखरने हसलरची हत्या करण्याचा कट रचला होता. त्यानुसार ६ जानेवारी रोजी दुपारी प्रमोदने मोठा भाऊ मंजुनाथ आणि लहान भाऊ चंद्रशेखर यांना पैसे देतो असे सांगून कारमधून सोबत नेले आणि विष मिसळलेली दारू पाजली. त्यानंतर मंजुनाथ आणि चंद्रशेखर यांचा कारमध्येच मृत्यू झाला.
त्यानंतर प्रमोद आणइ त्याचे मित्र नंदीसालू गावातील हेमंत नायक आणि सन्या नायक यांच्या मदतीने नायरा पेट्रोल पंपावर पेट्रोल खरेदी केले. प्रमोदने त्यानंतर मृतदेह असलेली गाडी होन्नावर तालुक्यातील सुरळी मुरकी येथे नेली. नंतर त्या दोघांवर पेट्रोल ओतून गाडी नाल्यात ढकलण्यात आली आणि अपघात भासवण्यात आला.