Nipani Accident | कोगनोळीजवळ भरधाव कारची कंटेनरला धडक ; कोल्हापूरचे उद्योजक दाम्पत्‍य ठार

बालिका गंभीर जखमी ; कारचा चक्काचूर
Nipani Accident
महामार्गावर कंटेनर ट्रकच्या धडकेनंतर चक्काचूर झालेली कार मयत दाम्पत्‍य हेतिका नाकारने व जिगर नाकारने
Published on
Updated on

निपाणी:पुढारी वृत्तसेवा पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळीजवळ भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या कंटेनर ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कोल्हापूर येथील उद्योजक दांपत्य ठार झाले.तर एक वर्षाची बालिका गंभीर जखमी झाली.हा अपघात शुक्रवारी झाला.घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली आहे.या अपघाताची भीषणता इतकी होती की, ट्रकला मागून कारची धडक बसल्यानंतर कारचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याने मोठे नुकसान झाले.

जिगर किशोर नाकराने (वय २८) हेतिका जिगर नाकराने (वय २४ ) रा. पाचगाव रोड,कळंबा कोल्हापूर अशी दोघा मयत झालेल्या पती-पत्नीची नावे असून बालिका वृष्टी (वय १ वर्ष ) ही गंभीर झाली असून तिच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, अपघातात मयत झालेले जिगर नाकराने हे मूळचे कच्छ (गुजरात) येथील रहिवासी असून त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायानिमित्त कोल्हापुर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा कागल येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये शिवम डोअर्स या नावाने लाकडी व प्लायवूड दरवाजे व इतर साहित्य निर्मिती करण्याचा व्यवसाय आहे.

दरम्यान मयत जिगर व त्यांच्या पत्नी हेतिका हे दोघेजण मुलगी वृष्टी हिच्यासमवेत शुक्रवारी सकाळी हुबळी येथे समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी कारने गेले होते. तेथून कार्यक्रम आटोपुन तिघेजण कारने कोल्हापूर येथे परतत होते.दरम्यान त्यांची कार पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी हद्दीत प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयासमोर आली असता पावती करण्यासाठी थांबलेल्या कंटेनर ट्रकला कारचालक जिगर नाकाराने यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारची मागून जोरात धडक बसली.

यामध्ये कारमध्ये पुढे बसलेले जिगर व हेतीका हे दोघे गंभीर जखमी झाले तर पाठीमागे असलेली वृष्टीही गंभीर जखमी झाली.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार घटनास्थळी डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी.एस.तळवार,ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील हवालदार परमानंद मारूसेठ, मंजुनाथ कल्याणी यांनी भेट देऊन जखमींना उपचारासाठी कोल्हापुर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान उपचार सुरू असताना रात्री १० च्या सुमारास हेतिका तर १२ च्या सुमारास जिगर यांचा मृत्यू झाला तर सध्या वृष्टी हिच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची भीषणता इतकी होती की कंटेनरला कार धडकल्यानंतर चक्काचूर झाला.याबाबत जिगर नाकारने यांचे नातेवाईक किमाजी नाजी पटेल इचलकरंजी यांनी ट्रक चालक इम्तिहास अनवर अली (रा.राजस्थान) याच्या विरोधात ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांनी चालविला आहे.दरम्यान शनिवारी सकाळी मयत जिगर व पत्नी हेतिका यांच्यावर कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुर्देवी अपघातात जिगर व हेतिका या दोघा पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने पाचगाव रोड कळंबा परिसरात शोककळा पसरली आहे.हेतिका यांचे माहेर पुसेसावळी ता.कराड जि.सातारा आहे. अंत्यसंस्कारास उद्योजक,व्यवसायिकासह कसा सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते. मयत जिगर यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ व जखमी मुलगी असा परिवार आहे.

पाळण्यामुळे वाचले वृष्टीचे प्राण

कारची कंटेनरला धडक बसल्यानंतर कारमध्ये दोघे पुढे बसलेले कारमधील बलून ओपन झाल्याने जिगर व त्यांच्या पत्नी हेतिका हे दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान मागे कारमध्ये दोघा पती-पत्नीने वृष्टीला पाळण्यामध्ये ठेवले होते. कारची कंटेनर ट्रकला धडक बसल्यानंतर कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.मात्र कारची मागील बाजू सुरक्षित राहिल्याने केवळ दैव बलवत्तर म्हणून पाळण्यात असलेली वृष्टी ही या अपघातात आश्चर्यकारकरीत्या बचावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news