

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : हिजाबला काही शाळांमध्ये विरोध करून धर्मांध लोकांकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज सोमवारी काँग्रेसअल्पसंख्यांक आणि एमआयएमच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ही दोन्ही आंदोलने वेगवेगळी करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत ही विविध धार्मांची भूमी आहे. या ठिकाणी विविध भाषा, संस्कृती आणि धर्म आहे. इस्लाम हा त्यापैकीच एक आहे. इस्लाममध्ये हिजाब हा स्त्रियांचा एक पोषाक आहे. काही महाविद्यालयांमध्ये चंगळवादी, हितसंबंध आणि धर्मांध लोक हिजाबला विरोध करून देशाची एकता आणि अखंडता बिघडवण्याचा आणि समाजातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाऊ-बहिणीच्या नात्याने जगलेल्या विद्यार्थ्यांमध्ये धर्माचे जंतू पेरण्याचे हे काम करत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. अशा असंवैधानिक शक्तींवर योग्य ती कारवाई करून मुस्लीम मुलींच्या संवैधानिक अधिकाराची पायमल्ली होणार नाही याची काळजी घ्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनामध्ये काँग्रेसचे अल्पसंख्यांचे जिल्हाध्यक्ष इमरान तपकीर, तबस्सुम मुल्ला, हाजी मुसा गौरीखान, एमआयएमचे राज्याचे सरचिटणीस लतीफखान पठाण, नगरसेवक शाहिदखान पठाण आदी सहभागी झाले होते.
हेही वाचलत का?