

दुबई; वृत्तसंस्था : 'भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी (आयसीसी) मोठ्या प्रमाणावर उत्पन्न आणत आहे. क्रिकेटची जागतिक स्तरावरील व्याप्ती वाढवण्यात भारताचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना 2024 ते 2027 या कालावधीत वर्षाला 23 कोटी अमेरिकन डॉलर मिळणे योग्य आहे,' असे प्रतिपादन इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गौड यांनी सांगितले. (BCCI)
यामुळे या मुद्द्यावर हरकत घेणार्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चांगली चपराक मिळाली आहे. आयसीसीच्या प्रस्तावित निधीवाटपानुसार एकूण उत्पन्नातील 38.5 टक्के उत्पन्न बीसीसीआयला मिळणार आहे. हे वार्षिक उत्पन्न 60 कोटी डॉलर असेल, असा कयास आहे. त्यातून इंग्लंडला 4 कोटी 13 लाख, ऑस्ट्रेलियाला 3 कोटी 75 लाख, पाकिस्तानला 3 कोटी 45 लाख डॉलर अपेक्षित आहेत. आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या 12 देशांना एकूण 53 कोटी 28 लाख मिळणार आहेत. आयसीसीच्या या प्रस्तावित वाटपावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. इंग्लंडने मात्र भारतास साथ दिली आहे. आयसीसीच्या उत्पन्नात वाढ करण्यात भारताचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना जास्त उत्पन्न द्यायला हवे. (BCCI)
अर्थात, काही मुद्द्यांबाबत मतभेद होऊ शकतात. मात्र, भारताची क्रिकेटमधील ताकद नाकारताच येणार नाही. एक अब्जाहून जास्त भारतीय क्रिकेटचा आनंद घेतात. आयपीएलमध्ये दहा संघ आहेत. उत्पन्नात सर्वांना चांगला वाटा मिळायला हवे हे खरे असले, तरी जागतिक क्रिकेटमधील भारतीय मार्केटची ताकद दुर्लक्षित करता येणार नाही. भारतीय संघाच्या दौर्यांचा संबंधित देशांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आंतरराष्ट्रीय मालिकांच्या वेळी सर्व उत्पन्न यजमान देशालाच मिळते. मात्र, आता यजमान देशांनी पाहुण्या संघातील खेळाडू, बोर्डाला रक्कम देणे उचित होईल. यास सुरुवात झाल्यास क्रिकेट बोर्डांना मिळणार्या रकमेतील तफावत कमी होण्यास नक्की मदत होईल. यजमान देशांनीही परदेशातील संघातील खेळाडूंना मानधन देण्यास सुरुवात केली, तर कसोटीस महत्त्व देणार्या खेळाडूंत नक्कीच वाढ होईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा;