मनोज जरांगे पलटी मारणारे, खोटे बोलणारे : बारस्कर महाराज

मनोज जरांगे पलटी मारणारे, खोटे बोलणारे : बारस्कर महाराज
Published on: 
Updated on: 

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे कायम पलटी मारतात आणि खोटे बोलतात, असा आरोप करत जरांगे यांचे कोअर कमिटीचे सदस्य असलेले अजय बारस्कर महाराज यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहे. मधल्या काळामध्ये अंतरवाली सराटीमध्ये जी घटना घडली, त्यानंतर मी आंदोलनाच्या या लढ्यात पुन्हा एकदा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदणीसाठी मी अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळेच मी जरांगे यांच्यासोबत सहभागी झालो होतो. मात्र, यापूर्वी कधीच मी माध्यमांसमोर आलो नाही. जरांगे अत्यंत हेकेखोर माणूस असून, ते कायम पलटी मारतात. एवढेच नव्हे, तर सतत खोटे बोलतात, अशा आरोपांच्या फैरी बारस्कर यांनी झाडल्या.

जरांगेंच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार

जरांगे यांच्या प्रत्येक कृतीचा मी साक्षीदार आहे. माझ्या मनात अनेक दिवसांपासून खदखद होती. ती मी व्यक्त करत आहे. यामुळे मला गोळ्या घालून मारून टाकू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, ते मी सहन करणार नाही, असे त्यांनी सांगितले. जरांगे यांनी रांजणगाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकार्‍यांसोबत गुप्त बैठक घेतली होती. त्याचाही मी साक्षीदार आहे. लोणावळा, वाशी येथेही मराठा समाजाला डावलून काही बैठका झाल्या. अशा गुप्त बैठकांना माझा आक्षेप होता. या गुप्त बैठकांचे अनेक पुरावे माझ्याकडे असल्याचा दावादेखील बारस्कर महाराज यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news