

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान आणि चीन यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या चीन पाकिस्तान कॉरिडॉरला बलुचिस्तानातील बंडखोरांनी लक्ष्य केले. या हल्ल्यात एक पाकिस्तानी सैनिक ठार झाला आहे, तर ७ बलुची बंडखोरही मारले गेले आहेत. (Baloch Separatists)
ग्वदार बंदर येथील एका प्रशासकीय इमारतीवर हा हल्ला करण्यात आला. बलुची बंडखोरांनी मोठ्या प्रमाणावर स्फोट घडवले आणि गोळीबार केला, असे येथील प्रशासकीय आयुक्त सईद अहमद उमराणी यांनी म्हटले आहे. ७ हल्लेखोर आणि एक सैनिक मारला गेल्याच्या वृत्ताला सईद यांनी दुजोरा दिला.
चीन-पाकिस्तान कॉरिडॉरमध्ये ग्वदार बंदर अत्यंत महत्त्वाचे आहे. या कॉरिडॉरमध्ये चीनने अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. चीनने बलुचिस्तानमध्येही मोठी गुंतवणूक केलेली आहे. बलुचिस्तान खनिज संपत्तीने समृद्ध असल्याने चीनचे या प्रदेशावर विशेष लक्ष आहे.
या हल्ल्याची जबाबदारी बलोच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. बलुचिस्तानातील विविध बंडखोर संघटनांपैकी ही महत्त्वाची संघटना मानली जाते. बलोच लिबरेशन आर्मीने यापूर्वी या भागातील चीनच्या कामगारांवर हल्ला केला होता.
हेही वाचा