नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले सोमय मुंडे यांना शौर्य चक्र प्रदान

नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले सोमय मुंडे यांना शौर्य चक्र प्रदान
Published on
Updated on

देगलूर : पुढारी वृत्‍तसेवा : नक्षलवादाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीतील मर्दिनटोला छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असून घनदाट जंगलाने व्यापला असल्याने तेथुन बाहेर संपर्क करणे ही कठीण आहे. अशा परीसरात दि.13 नोव्हेंबर 2021 रोजी सी 60 तुकडीच्या पोलीस जवानांसोबत हाय प्रोफाईल नक्षलवाद्यांशी 10 तास झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खातमा करून आपल्या तुकडीतल्या जवानांना सुखरूप बाहेर काढले.

हि देशातील सर्वात मोठी कारवाई समजल्या जाणाऱ्या ऑपरेशनचे नेतृत्व देगलूरचे रहिवाशी असलेले पण सध्या लातूर येथे पोलीस अधिक्षक असलेले सोमय मुंडे यांनी अतिशय चातुर्य ,धाडसाने व संयमाने यशस्वी करून अख्या महाराष्ट्राच्या पोलीसांची मान उंचावल्याने देगलूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता.त्यांच्या याच पराक्रमाची दखल घेऊन भारत सरकार द्वारे दिला जाणारा पोलिस दलातील अत्यंत मानाचा असा शौर्य चक्र पुरस्कार दि.9 मे रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सोमयचे आई व वडील अंबाजोगाई तालुक्यातील आपले मूळ गाव सोडून गेल्या 40 वर्षांपासून देगलूर येथे वैद्यकीय सेवा बजावण्यासाठी स्थायिक झाले. लहानपणापासूनच सोमाय मुंडे यांना सैनिकी, मिल्ट्री स्कूल मधून देशसेवा व धाडसी कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याने त्यांनी युपीएससी उत्तीर्ण करून धाडसी व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगल्याने सन 2016 साली युपीएससी उत्तीर्ण करून औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यात इंचार्ज पोलीस निरीक्षक पदी रुजू झाले. त्याठिकाणी तीन महिन्यात वाळू माफियांना वठणीवर आणले. त्यानंतर दुसरी पोस्टिंग अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुस्ती येथे डीवायएसपी म्हणून रूजू झाल्यानंतर येथे त्‍यांनी उल्‍लेखनीय काम केले. कोरोना काळात चोरी व अवैध धंदे करणाऱ्यांचे पुनर्वसन करून त्यांनी समाजकार्याचेही उत्तम उदाहरण दिले होते.

9 महिन्यांपूर्वी स्वतःहून नक्षलवाद्यांचा गड मानला जाणारा गडचिरोली जिल्ह्यात त्‍यांनी अतिरिक्त पोलीस अधिक्षक पदाचे सूत्रे हाती घेतले. दि.13 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या 60 जवानांच्या तुकडीसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आपल्या बौद्धिक चातुर्य व धाडस आणि संयमाने धानोरा तालुक्यातल्या ग्यारापत्ती-कोटगुल ,मर्दिनटोला जो छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत घनदाट जंगलाने व्यापलेल्या अशा परीसरात सी 60 तुकडीच्या पोलीस जवानांसोबत शस्त्रास्त्रे व हत्याराने पुरेपुर असलेल्या 120 ते 130 हाय प्रोफाईल नक्षलवाद्यांशी 10 तास झालेल्या चकमकीत आपल्या तुकडीतील अनेक जवान जखमी होवून रक्तबंबाळ झाले होते. मात्र अशा परिस्थितीत मुंडे 8 नक्षलवाद्यांचा खात्‍मा केला.

आपल्या साथीदारांना प्रोत्साहित केले व नक्षलवाद्याच्या समुहावर 1 कोटी 32 लाखाचे बक्षीस असलेल्या 26 नक्षलवाद्यांचा खात्‍मा करत नक्षलवादाचा प्रमुख मिलिंद तेलतुंबडे ज्याच्यावर 50 लाखाचे बक्षीस होते. त्याचाही खात्मा केला आणि आपल्या सर्व तुकडीतील साथीदारांनाही नक्षलवाद्यांच्या घेरावातून सुखरूप बाहेर काढले याचीच दखल घेऊन भारत सरकारने पोलीस दलात अत्यंत मानाचा मानला जाणारा शौर्य चक्र पुरस्कार सध्या लातूर येथे पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले देगलूरचे सुपुत्र सोमय मुंडे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात दि 9 मे रोजी प्रदान करण्यात आला. त्यामुळे नक्षलवाद्यांत आपला दबदबा निर्माण करत देशात महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावणारा सोमय मुंडे यांनी पुन्हा देगलूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news