

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या व्हिसा नियमांमधील बदल १ जुलैपासून लागू केले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मे महिन्यात झालेल्या द्विपक्षीय कराराचाही या नियमांमध्ये विचार करण्यात आला आहे. मोबिलिटी अरेंजमेंट फॉर टॅलेंटेड अर्ली-प्रोफेशनल्स स्कीम (METS) अंतर्गत ऑस्ट्रेलिया दरवर्षी भारतातील ३ हजार तरुण व्यावसायिकांना जास्तीत जास्त आठ वर्षे व्हिसाशिवाय काम करण्याचा पर्याय देईल.
मेट्स अंतर्गत भारतातील ३ हजार तरुण व्यावसायिकांना जास्तीत जास्त आठ वर्षे व्हिसाशिवाय ऑस्ट्रेलियात काम करता येणार आहे. याशिवाय भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा प्रायोजक नसतानाही ऑस्ट्रेलियात दोन वर्षे घालवता येणार आहेत. मेट्स हा मुळात एक तात्पुरता व्हिसा कार्यक्रम आहे, जो अभियांत्रिकी, खाणकाम, आर्थिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा यासारख्या क्षेत्रातील पदवीधरांना ऑस्ट्रेलियामध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
१५ दिवसात जास्तीत जास्त 48 तास काम
नवीन व्हिसा नियमांनुसार, १ जुलैपासून सर्व विद्यार्थी व्हिसाधारक १५ दिवसांत जास्तीत जास्त ४८ तास काम करू शकतील. तथापि, वृद्धांच्या देखभालीसाठी अशी कोणतीही कालमर्यादा लागू केलेली नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाबाबत गंभीर व्हावे हा या नियमाचा उद्देश आहे.