

पाचोड : पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवरुन ट्रीपलसीट जाणाऱ्या दोन भावांचा बीड बायपास सहारा सिटीजवळ क्रेनच्या धडकेत दोन दिवसापूर्वी अपघात झाला होता. या भीषण अपघातात लहान भाऊ वैजनाथ नागरे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर मोठ्या भावासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या मोठ्या भावाचाही आज (दि.१९) दुपारी मृत्यू झाला. शिवाजी तातेराव नागरे (वय ३६) असे मृत्यू झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे.
या दोघा सख्ख्या भावांचा पाठोपाठ अपघाती मृत्यू झाल्याने नागरे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबियांचे आधारवड असलेले दोन्ही कमावत्या व्यक्ती काळाने हिरावून घेतल्या. या दुर्देवी घटनेने काद्राबाद (ता. औरंगाबाद) गावावर शोककळा पसरली आहे. या प्रसंगावर ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,काद्राबाद (ता. औरंगाबाद) येथील वैजीनाथ नागरे , शिवाजी नागरे आणि नामदेव गायकवाड हे तिघे जण गवंडी काम करतात. ते तिघेजण दुचाकी (क्रमांक एम.एच.२० एफ.झेड ३४७०) वरुन काद्राबादहून औरंगाबादकडे येत होते. दरम्यान बीड बायपासवरील सहारा सिटी समोर येताच त्यांच्या दुचाकीला रविवारी (दि.१७ ) सकाळी ९ च्या सुमारास क्रेन (क्रमांक एम.एच.२० एफ.जी.३८१४ ) ने जोराची धडक दिली होती. यात भीषण अपघातात वैजीनाथ नागरे याचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांचा मोठा भाऊ शिवाजी नागरे व नामदेव गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, आज शिवाजी नागरे यांचा मृत्यू झाला.
हेही वाचलंत का ?