

पुढारी ऑनलाईन : देशाच्या स्वातंत्र्य क्रांतीची खरी सुरूवात ही आजच्या दिवसापासून झाली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरूद्ध 'चले जाव'चा नारा आजच्याच दिवशी देण्यात आला. तेव्हा स्वातंत्र्यसैनिक होते, म्हणून आज आपण आहोत, त्यामुळे आजचा दिवस स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्य सैनिक, शहिदांना नमन करण्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती मैदानातून आज (9 ऑगस्ट क्रांती दिन) क्रांती दिनानिमित्त केले. ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित 'मेरी माटी, मेरा देश' कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, इंग्रजांची एकही खूण आपल्या देशात नको आहे. गुलामीच्या सर्व खुणा आपल्याला पुसून टाकायच्या आहेत. इग्रजांची एकही खूण आपल्याला आपल्या देशात नको आहे. यासाठी पीएम मोदी यांनी देखील पुढाकार घेतला असून, दिल्लीतील 'राजपथ'चे नाव बदलून 'कर्तव्यपथ' करण्यात आले आहे. आजचा कार्यक्रम ऑगस्ट क्रांती मैदानातून होत आहे. कारण ऑगस्ट क्रांती मैदानाचे एक ऐतिहासिक महत्त्व आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (9 august kranti din)
जाती पातीमुळे भारतात भेदभाव होणार नाही, याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. लोकांच्या अधिकार लक्षात राहतात, पण आपण कर्तव्य विसरतो, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. (9 august 1942 kranti din)
मुंबईत विकासाची कामं सुरूच आहेत. पण अनेकांच्या पोटात दुखतं त्यामुळे ते नेहमीच टीका करतात. पण निंदकाचे घर असावे शेजारी, असे म्हणतात तसेच आपल्या शेजारी निंदकांचे घर आहे असे समजूनच आपण आपली वाटचाल केली पाहिजे, अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई बदलतेय, असा विश्वासही फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केला.