भ्रष्टाचार, घराणेशाहीला जनतेकडूनच ‘चले जाव’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

(PM Vishwakarma Yojana)
(PM Vishwakarma Yojana)

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जनता वैतागली आहे. संतापली आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही, लांगूलचालन यांना जनतेने 'चले जाव' म्हटलेले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला. विरोधक देशातील विकासकामांत अडथळे आणत असल्याची टीकाही त्यांनी केली.

देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांचे व्हर्च्युअल भूमिपूजन केल्यावर पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना थेट निशाण्यावर घेतले. ते म्हणाले की, 'आम्ही काम करणार नाही, इतरांनाही करू देणार नाही' हे विरोधकांचे तत्त्व बनले आहे. चांगल्या कामांना विरोध एवढेच ते करत आहेत. विरोधकांनी संसदेच्या नवीन इमारतीला विरोध केला, शहिदांच्या वॉर मेमोरियलला विरोध केला, त्यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारता आला नाही, त्यांनी सरदार पटेल यांना अभिवादन केले नाही. अशा नकारात्मक राजकारणाबाहेर पडत देश सकारात्मक मार्गाने पुढे जात आहे. सकारात्मक राजकारणाच्या सहाय्याने आपले सरकार विकासाच्या संधी निर्माण करत आहे. ते म्हणाले की, भ्रष्टाचार, घराणेशाही, लांगूलचालन यांना जनता वैतागली आहे. जनतेने विरोधकांना केव्हाच 'चले जाव' म्हटले आहे.

जगाचे लक्ष भारताकडे

मोदी म्हणाले की, विकसित देश होण्याकडे भारताची वेगाने घोडदौड सुरू आहे. हा अमृतकाळाचा शुभारंभ आहे. त्यामुळे अवघे जग भारताकडे आशेने बघत आहे. नवी ऊर्जा, नवी प्रेरणा आणि नवीन निर्धारासह भारतीय रेल्वेच्या इतिहासाचे नवीन पर्व सुरू झाल्याचेही ते म्हणाले.

ऐतिहासिक पाऊल

देशातील 508 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील स्थानके नव्या रूपात उभी राहणार आहेत. या उपक्रमातून भारतीय रेल्वेचा कायापालट होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. देशातील एकूण 1309 स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा मनोदय असून हा पहिला टप्पा असल्याचेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news