

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून औषधी गोळीतून महिलेला ब्लेड देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. सोमनाथ साधू सपकाळ (वय 45, रा. उत्तमनगर) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत छाया सोमनाथ सपकाळ (वय 42) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमनाथ याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ पत्नी छाया यांच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. काही महिन्यांपूर्वी सोमनाथचा भाऊ घरी दारू प्यायला आला होता. त्यावेळी छायाने सोमनाथशी वाद घालून त्याला घरी दारू प्यायला बोलावू नका, असे सांगितले होते. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता.
सोमनाथने औषधी गोळ्यात ब्लेड टाकून त्या गोळ्या पत्नी छाया यांना दिल्या. ब्लेड गिळाल्याने त्यांना त्रास झाला. त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन उपचार घेतले. वैद्यकीय चाचणीत त्यांच्या पोटात ब्लेडचे तुकडे असल्याचे दिसून आले. यापूर्वी देखील आरोपी पतीने अशाप्रकारे तीन वेळा कृत्य केले आहे. सोशल मीडियावर पाहून त्याच्या डोक्यात ही कल्पना आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथला अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
हेही वाचा :