Asian Games 2023 | टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत भारताला रौप्यपदक
पुढारी ऑनलाईन : चीनमधील हँगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या साकेथ मायनेनी आणि रामकुमार रामनाथन यांना टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत चायनीज तैपेईच्या जेसन जंग आणि यू-हसिउ सू जोडीकडून ४-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामना १ तास १२ मिनिटे चालला.
विशेष म्हणजे, रामकुमार रामनाथनचे हे पहिले पदक आहे. तर आशियाई क्रीडा स्पर्धेतील साकेथचे हे तिसरे पदक आहे. त्याने २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सनम सिंगसोबत पुरुष दुहेरीत रौप्यपदक आणि सानिया मिर्झा सोबत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
संबंधित बातम्या
- Asian Games 2023 | भारताचा आठवा सुवर्णवेध! १० मीटर पिस्तूल प्रकारात पलकला सुवर्ण, ईशा सिंगला रौप्यपदक
- Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवसाची 'सोनेरी' सुरुवात; ऐश्वर्य, स्वप्निल आणि अखिलने नेमबाजीत घेतला सुवर्णवेध
- Asian Games 2023 : रोशिबिनाची वुशूमध्ये 'रौप्य', तर अनुष अग्रवालाची घोडेस्वारीत कांस्य पदकाला गवसणी
- Asian Games 2023 : स्क्वाश स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव
साकेथ आणि रामकुमार यांनी कोरियाच्या सेओंगचान हाँग आणि सूनवू क्वोन यांचा ६-१, ६-७(६), १०-० असा पराभव करून पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीची अंतिम फेरीत खेळलेली साकेथ मायनेनी आणि रामकुमार रामनाथन ही सातवी भारतीय जोडी आहे.
सुमित नागल आणि अंकिता रैना यांनी बुधवारी त्यांचे उपांत्यपूर्व फेरीतील सामने गमावल्यामुळे भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले होते. भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांची संख्या २९ वर गेली आहे. यात ७ सुवर्ण, १० रौप्य आणि ११ कास्यंपदकांचा समावेश आहे.
आशिया क्रीडा स्पर्धेत भारताची आज शुक्रवारी सुरुवात चांगली झाली. ५० मीटर रायफल नेमबाजीत पुरुषांच्या संघाने भारताला सातवे सुवर्ण पदक मिळवून दिले. ऐश्वर्या प्रताप सिंग, स्वप्नील आणि अखिल यांनी नेमबाजीत कमाल केली. तिघांनी मिळून ५० मीटर रायफल ३ पोझिशन पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिघांनी मिळून १७६९ गुण मिळवले. चीनच्या लिनशू, हाओ आणि जिया मिंग या जोडीला रौप्यपदक मिळाले. त्याचवेळी कोरियाच्या खेळाडूंनी कास्यंपदक पटकावले.

