

brown sugar : राज्यात अंमली पदार्थ तस्करीचे प्रकरणा गाजत आहे. धुळ्यातील मुंबई- आग्रा महामार्गावर एका तरुणाकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीचे अर्धा किलो ब्राऊन शुगरचा साठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अंमली पदार्थाची मोठी खेप धुळ्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर व मोहाडी पोलिसांना मिळाल्याने पथक या तस्कराच्या मागावर होते. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात यश मिळाले आहे.
नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी जी शेखर यांच्या पथकाला धुळ्यात अंमली पदार्थाची मोठी तस्करी होणार असल्याची माहीती मिळाली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून या पथकातील पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व मोहाडी पोलिस ठाण्याचे पथक मिळालेल्या माहीतीच्या आधारावर या तस्कराच्या मागावर होते. पण संबंधीत तस्कर हा हाती लागत नव्हता.
अखेर मुंबई- आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेंन्सीच्या बाहेर एक युवक उभा असून त्याच्याकडे अंमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती मिळाली. या पथकाने या तरुणास ताब्यात घेवून त्याची अंग झडती घेतली. यावेळी त्याच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीचा अर्धा किलो ब्राऊन शुगरचा साठा आढळून आला.
प्राथमिक चौकशीत या तरुणाचे नाव सैयद शेरु सैयद बुडन असून तो भुसावळ शहरातील मदीना मशीदीजवळीत रहिवाशी आहे. या तरुणाने भुसावळ येथून अंमली पदार्थाचा साठा घेवून तो धुळ्यात विक्रीसाठी आणला असल्याची माहिती पोलिसांना दिली. पण अर्धा किलोचा साठा खरेदी करणारा धुळ्यातील तस्कर कोण? याचा तपास लावण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
दरम्यान अटकेत असलेला अंमली पदार्थाचा तस्कर हा पोलिस तपासाला सहकार्य करीत नसल्याची माहिती पुढे येते असून धुळे शहरात अंमली पदार्थाचा मोठा व्यापार सुरु असल्याची माहिती या तपासातुन पुढे येते आहे.
या घटनेची गंभीर दखल धुळ्याचे पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील व अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी घेतली आहे. या आरोपीची कसुन चौकशी करणे सुरु झाले आहे. हा साठा नाशिक, पुणे किंवा मुंबई येथे मुंबई आग्रा महामार्गावरुन रवाना होण्याची शक्यता देखील पोलिस तपासून पाहत आहेत .