

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या बसमधून हजारो प्रवाशांची सुखरूपपणे ने-आण करण्याची मोठी जबाबदारी आता माझ्यावर आली आहे आणि ती जबाबदारी मी कर्तव्य दक्ष राहून पूर्ण करणार आहे. असे एसटीच्या पहिल्या महिला चालक अर्चना अत्राम यांनी दै.'पुढारी'शी बोलताना सांगितले. एसटीच्या पुणे विभागात नुकत्याच 6 महिलांची चालक पदावर नियुक्ती झाली आहे. यातीलच सासवड आगारात दोन दिवसांपुर्वी नियुक्त झालेल्या आणि नियुक्तीनंतर पहिली महिला चालक म्हणून प्रवासी वाहतूक फेरी पुर्ण करण्याचा मान मिळविलेल्या महिला चालक अर्चना अत्राम यांच्याशी दै.'पुढारी'च्या प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी अत्राम यांनी प्रतिनिधीला प्रशिक्षण घेतानाचा अनुभव आणि आता प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक करतानाचा अनुभव सांगितला.
वडील आणि दोन्ही भावांचा मिळाला पाठींबा…
अर्चना या मुळच्या सारकणी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहेत. त्यांच्या घरी वडील, दोन मोठे भाऊ आणि दोन वहिनी असे त्यांचे कुटूंब. त्यांच्यावर आईचे छत्र नाही, मात्र, त्यांना वडील आणि दोन्ही मोठ्या भावांचा खूप मोठा पाठींबा आहे, त्यांनी दिलेल्या पाठींब्यामुळेच अर्चना यांनी एसटी चालक म्हणून काम करण्यास प्रोत्साहन मिळाले. असेही अर्चना यांनी बोलताना सांगितले.
पुर्वी सायकल चालवता येत नव्हती; आता बस चालवते…!
सन 2019 साली झालेल्या भरतीमध्ये माझी एसटी चालक पदाकरिता निवड झाली. त्यानंतर कोरोना काळ संपत आल्यावर मला प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले. प्रशिक्षण पुण्यामध्ये सुरू झाले. त्यापुर्वी मला साधी सायकल देखील चालवता येत नव्हती. आता सायकलसह बस चालवते, याचा मला खूप आनंद होत आहे. असे आत्राम यांनी सांगितले.
प्रशिक्षणावेळी मिळाले यांचे मार्गदर्शन…
पुण्यात मला प्रशिक्षण घेताना मला गाडीचा ब्रेक, अॅक्सीलेटर, क्लच आणि बसमधील इतर कोणतीही माहिती नव्हती. परंतु, मला मिळालेल्या शिक्षक गुरूवर्यांनी म्हणजेच हेडगे सर, खळदकर सर आणि शितोळे सरांचे मौल्यवान मार्गदर्शन मिळाले. आणि मी एसटी चालविण्याचे प्रशिक्षण पुर्ण करू शकले. तर आता प्रवासी वाहतूकीसाठी गाडी चालवताना आमच्याच गाडीवर असलेले माझे सहकारी वाहक (कंडक्टर) संदीप कोलते यांचे सुध्दा मला खूप मोठे मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे गाडी चालवताना कसलीही भिती वाटत नाही.
हे ही वाचा :